हथरस हत्या घटना प्रकरणी न्यायालयात प्रतिपादन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उत्तर प्रदेशातील हथरस येथे काही आठवडय़ांपूर्वी झालेल्या दलित महिलेच्या बलात्कार व हत्या प्रकरणाचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेले केरळचे पत्रकार सिद्दिकी काप्पन हे जातीय विद्वेष पसरविणारे लिखाण करतात असे प्रतिपादन उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात केले आहे. काप्पन हे पीएफआय या वादग्रस्त संघटनेचे सदस्य असल्याचाही आरोप करण्यात आला.
काप्पन यांना हथरस येथे जाताना उत्तर प्रदेश पोलिसांनी 5 ऑक्टोबरला अटक केली होती. त्यांच्यावर जातीय विद्वेष पसरविल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यांच्या वतीने केरळ पत्रकार संघाने सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका सादर केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत उत्तर प्रदेश सरकारने प्रतिज्ञापक्ष सादर केले असून त्यात काप्पन यांच्यावर अनेक दोषोरोप करण्यात आले आहेत.
याचिकेला विरोध
महाधिवक्ता तुषार मेहता यांनी या याचिकेला विरोध करताना अनेक कायदेशीर मुद्दे मांडले आहेत. हथरस प्रकरणी पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच काप्पन यांनी त्यांच्या वकीलांशी संपर्कही साधला आहे. मात्र, ते पत्रकारितेच्या आवरणाआड जातीयता फैलावण्याचा प्रयत्न करीत आहेत हे त्यांच्या लिखाणावरून दिसते. त्यामुळे सध्याच्या संवेदनशील परिस्थितीत त्यांना हथरसला जाण्यास अटकाव करण्याची कृती योग्य होती, अशी बाजू त्यांनी मांडली.
कपिल सिबल यांना प्रश्न
काप्पन यांची बाजू मांडणारे कपिल सिबल यांना खंडपीठाने अनेक प्रश्न विचारले. तसेच सरकारचे प्रतिज्ञापत्र पाहण्याची सूचना केली.









