सिडनी / वृत्तसंस्था :
यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंडचा संघ आज (दि. 3) तिसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरेल, त्यावेळी उरलीसुरली पत राखण्याचाच त्यांचा प्रयत्न असेल. मात्र, न्यू साऊथ वेल्स राज्यात भडकलेल्या आगीच्या धुराचे लोट या लढतीत दुसऱया दिवसाच्या खेळात व्यत्यय आणण्याची दाट शक्यता आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, पहाटे पाच वाजता खेळाला सुरुवात होईल.
न्यू साऊथ वेल्समधील वणवा सातत्याने भडकतच राहिला आहे. त्यामुळे, धुराचे लोट सिडनीत शनिवारपर्यंत निश्चितपणाने दाखल होण्याचे सध्याचे संकेत आहेत. याच कारणामुळे, कॅनबेरा येथे आयोजित बिग बॅश लीगमधील लढतही यापूर्वी रद्द करावी लागली होती. या कसोटी सामन्यादरम्यान खेळाला अनुकूल स्थिती आहे का, याचा निर्णय पंच घेतील. यापूर्वी, पर्थ व मेलबर्नमधील दोन्ही लढतीत न्यूझीलंडला चार दिवसाच्या आतच नामुष्कीजनक पराभव स्वीकारावे लागले होते. त्यामुळे, येथे तरी उरलीसुरली पत राखता येणार का, याचाच शोध किवीज संघाला असेल.
न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघाला चारीमुंडय़ा चीत करण्यात अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळवले असल्याचे कबूल केले असून ऑस्ट्रेलियाकडे प्रतितास 145 किलोमीटर्स वेगाने मारा करु शकणारे 3 जलद गोलंदाज आणि नॅथन लियॉनसारखा अव्वल फिरकीपटू असल्याने यामुळे बराच फरक पडला असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.
न्यूझीलंडसमोर अनेक चिंता
यापूर्वी मेलबर्न कसोटीत पर्यायी सलामीवीर टॉम ब्लंडेलने दुसऱया डावात शतक झळकावले, ती न्यूझीलंडसाठी एकमेव सकारात्मक बाब ठरली. येथे तो टॉम लॅथमच्या साथीने सलामीला उतरेल. पण, या दौऱयात खराब फॉर्ममध्ये असलेल्या कर्णधार केन विल्यम्सनबद्दल साशंकता आहे. विल्यम्सन फ्लू-सदृश आजाराने त्रस्त असून बुधवारी तो सरावाला उतरला नव्हता तर फलंदाज हेन्री निकोल्सही खेळू शकणार का, याबद्दल संभ्रम आहे. या परिस्थितीत जीत रावळ हा एकमेव स्पेशालिस्ट फलंदाज संधीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, त्याला खराब फॉर्ममुळे मेलबर्न कसोटीत संधीही दिली गेली नव्हती.
जलद गोलंदाज ट्रेंट बोल्ट स्टार्कच्या बाऊन्सरवर जायबंदी होत बाहेर पडल्याने किवीज संघासमोर आणखी अडचणी आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने मालिका जिंकली असली तरी तिसऱया कसोटीतही आपला संघ पूर्ण ताकदीनेच लढेल, असे स्पष्ट केले आहे. खेळपट्टीचे स्वरुप पाहता, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क व जेम्स पॅटिन्सन या जलद गोलंदाजांसह ते दोन फिरकीपटू खेळवू शकतात.