अपघातांची समस्या भारतीय रेल्वेच्या पाचवीलाच पुजलेली आहे. अनेक प्रयत्न करूनही अपघात टाळणे कित्येकदा रेल्वेचालकाला अशक्मय होते. कारण रेल्वे अन्य वाहनांसारखी त्वरित थांबवता येत नाही. आता यावर रेल्वेच्या तंत्रज्ञांनी रामबाण उपाय शोधून काढला आहे. त्यांनी अशाप्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविली आहेत की जी स्वयंचलित पद्धतीने काम करतात आणि चालकालाही लक्षात येण्यापूर्वी पुढील परिस्थितीचा अंदाज घेऊन क्रियान्वित होतात.
रेल्वेच्या चालकांना रात्रीही काम करावे लागत असल्याने कित्येकदा रेल्वे चालवत असतानाच त्यांना डुलकी लागते आणि त्या काळात अपघात घडण्याची शक्मयता जास्तीत जास्त असते. कित्येकदा रेल्वे स्टेशनात येत असताना लाल दिवा लागलेला असूनही थांबत नाही. याला कारण चालकाची पेंग किंवा दुर्लक्ष हे असू शकते. आता रेल्वेने असे उपकरण बनविले आहे, की जे लाल दिवा लागलेला असताना इंजीन आपोआप थांबवेल. त्यामुळे चालकाची स्थिती कशीही असली तरी अपघात टळणार आहे. त्याचप्रमाणे चालकाकडून एखादी तांत्रिक चूक झाली तरी हे उपकरण कार्यरत होणार असून रेल्वे थांबविली जाऊ शकणार आहे.
या उपकरणाच्या सर्व चाचण्या यशस्वी ठरल्या असून आता देशभरात प्रत्येक रेल्वे सिग्नल आणि रेल्वे इंजीनात ते बसविले जाणार आहे. ऑटोब्रेक सिस्टीममुळे चालकांनाही मोठे साहाय्य होणार आहे. कोणत्याही अडथळय़ापासून रेल्वे 500 मीटर दूर असतानाच हे उपकरण क्रियान्वित होणार असल्याने रेलवे थांबण्यासाठी पुरेसे अंतर उपलब्ध होणार आहे. यामुळे चालक आणि प्रवासी या दोघांवरीलही ताण दूर होणार असून रेल्वेप्रवास सुखकर आणि सुरक्षित होण्याची शक्यता आहे.









