मिरज / प्रतिनिधी
मिरज-पंढपूर रोडवरील सिध्देवाडी खण येथे रस्ते बांधकाम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांनी शुक्रवारी रात्री एका हॉटेलमध्ये सिगारेटसाठी राडा केला. दारुच्या नशेत त्यांनी एक चारचाकी जाळली तर तीन मोटारसायकली फोडल्या. याबाबत ग्रामीण पोलिसांनी कन्हैय्या सिंग (वय 29) आणि रुपेंद्र तोमर (वय 28) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सदरच्या घटनेनंतर हॉटेल चालकाने पळ काढला.
सिध्देवाडी खण येथे रस्ते बांधकाम सुरू आहे. यावर परप्रांतीय कामगार काम करीत आहेत. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता हॉटेल, पानपट्टय़ा बंद आहेत. सदर कामावर असणाऱया दोघा कामगारांना शुक्रवारी रात्री सिगारेट ओढण्याची तलफ झाली. त्यांनी शेजारीच असणाऱया हॉटेलमध्ये सिगारेटची मागणी केली. तेथील कामगारांना सिगारेट नसल्याचे सांगताच त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी शिवीगाळ करीत तोडफोड करण्यास सुरूवात केली. यावेळी नशेत त्यांनी एक चारचाकी जाळली तर तीन मोटारसायकली फोडल्या आहेत.








