अरुणाचलमध्ये मंगळवारी किंवा बुधवारी शपथविधी
वृत्तसंस्था/ गंगटोक
सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे (एसकेएम) नेते प्रेमसिंहग तमांग हे 10 जून रोजी दुसऱ्यांदा सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. एसकेएमने विधानसभा निवडणुकीत राज्यातील 32 पैकी 31 जागांवर विजय मिळविला आहे. तमांग आणि त्यांच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोमवारी संध्याकाळी 4 वाजता पलजोर स्टेडियममध्ये पार पडणार आहे.
दुसरीकडे भाजप नेते पेमा खांडू हे 11 किंवा 12 जून रोजी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होतील. 10 जून रोजी खांडू यांची भाजप विधिमंडळ नेता म्हणून निवड होणार आहे. याचदरम्यान नॅशनल पीपल्स पार्टीने पेमा खांडू सरकारला समर्थन जाहीर केले आहे.
सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे नेते प्रेमसिंह यांनी स्वत:च्या कार्यकर्ते तसेच समर्थकांना पलजोर स्टेडियममध्ये होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सोहळ्यात सामील होण्यासाठी कुठल्याही पासची आवश्यकता नसल्याचे पक्षाचे महासचिव पवन गुरुंग यांनी सांगितले आहे. शिक्षण विभागाने मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यासाठी राज्याच्या राजधानी अंतर्गत येणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
अरुणाचल प्रदेशमधील भाजप नेते पेमा खांडू हे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले आहेत. अरुणाचलमध्ये भाजपने 60 सदस्यीय विधानसभेत 46 जागा जिंकल्या आहेत. तसेच पक्षाने राज्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळविला आहे.









