क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
आयएसएलमधील संघ जमशेदपूर एफसीने 20 वर्षीय फुटबॉलपटू कोमल थाटल याला तीन फुटबॉल मोसमासाठी करारबद्ध केले आहे. कोमलने 17 वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. जमशेदपूर एफसीशी त्याचा करार मे 2024 पर्यंत असेल.
एटीके एफसीला असताना कोमलने आयएसएलमध्ये आपला पहिला सामना 2018 स्पर्धेत जमशेदपूर एफसीविरूद्ध खेळला होता. त्यानंतन एटीके एफसीला दोन मोसम व नंतर नव्यानेच स्थापन झालेल्या एटीके मोहन बागानला तो गतमोसमात खेळला. एकूण 26 सामन्यांत खेळून त्याने एक गोलही नोंदविला.
सिक्कीममध्ये जन्मलेल्या कोमलने 2011 मध्ये नामची स्पोर्ट्स अकादमीला खेळून आपल्या फुटबॉल कारकिर्दीची सुरूवात केली. त्यानंतर तो एआयएफइफच्या एलीट अकादमीत दाखल झाला. 17 वर्षांखालील भारतीय युवा फुटबॉल संघात खेळाताना कोमलने 31 सामन्यांत 8 गोल केले. जमशेदपूर एफसीची प्रशिक्षक ओवेन कॉयल हे कोमलच्या खेळावर प्रभावित आहेत. तो आक्रमक आणि वेगवान खेळ करत असून जिंकण्यासाठी तो नेहमीच आतुर असतो, असे ओवेन म्हणाले.









