ऑल इंग्लंड बॅडमिंटन : साई प्रणीत, प्रणॉय, समीर व सौरभ वर्मा यांचा पराभव
वृत्तसंस्था /बर्मिंगहम
भारताचे प्रमुख बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत, लक्ष्य सेन यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली.
सहाव्या मानांकित पीव्ही सिंधूने चीनच्या झी यि वांगचा 21-18, 21-13 असा पराभव केला. 42 मिनिटांत सिंधूने हा सामना संपवला. सायना नेहवालने स्पेनच्या बियाट्रिझ कोरालेसवर केवळ 38 मिनिटांत 21-17, 21-19 अशी मात केली. पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतने थायलंडच्या कांताफोन वांगचेरॉनचा 21-18, 21-14 तर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य जिंकलेल्या लक्ष्य सेनने आपल्याच देशाच्या सौरभ वर्माचा 21-17, 21-7 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असणाऱया सिंधूची पुढील लढत जपानची सायाका ताकाहाशी किंवा थायलंडची सुपनिदा केटथाँग यापैकी एकीशी होईल. 2015 मध्ये या स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेल्या सायनाची पुढील लढत द्वितीय मानांकित जपानची अकाने यामागुची किंवा इस्टोनियाची क्रिस्टिन कूबा यापैकी एकीशी होईल. सिंधू व सायना यांनी दुसरी लढत जिंकली तर तिसऱया फेरीत दोघांची एकमेकीशी गाठ पडणार आहे.
पुरुष एकेरीत बी. साई प्रणीतला अग्रमानांकित व ऑलिम्पिक चॅम्पियन डेन्मार्कच्या व्हिक्टर ऍक्सेलसेनकडून 20-22, 11-21 असा पराभव स्वीकारावा लागला. 48 मिनिटे ही लढत रंगली होती. एचएस प्रणॉयलाही पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या आठवडय़ात जर्मन ओपन स्पर्धा जिंकणाऱया कुनलावत वितिदसमकडून झुंजार लढतीत त्याला 15-21, 22-24 असा पराभव स्वीकारावा लागला तर समीर वर्माला नेदरलँड्सच्या मार्क कॅलोने 41 मिनिटांच्या खेळात 21-18, 21-11 असे पराभूत केले.
पुरुष दुहेरीत पाचव्या मानांकित भारताच्या सात्विकसाईराज रनकिरेड्डी व चिराग शेट्टी यांनी स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन व ऍडम हॉल यांच्यावर 21-17, 21-19 अशी मात करून दुसरी फेरी गाठली. मात्र एमआर अर्जुन व धुव कपिला यांना इंडोनेशियाच्या द्वितीय मानांकित मोहम्मद एहसान व हेंद्रा सेतियावन या जोडीकडून संघर्षपूर्ण लढतीत 21-15, 12-21, 18-21 असा पराभव स्वीकारावा लागला.
कृष्णा प्रसाद गरग व विष्णुवर्धन गौड पंजला यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. जर्मनीच्या मार्क लॅमफस व मर्विन सीडेल यांनी त्यांना 21-16, 21-19 असे हरविले. महिला दुहेरीत त्रीसा जॉली व पुलेला गायत्री गोपीचंद यांनी विजयी सलामी देताना थायलंडच्या बेनयापा एमसार्द व नुनताकर्न एमसार्द यांच्यावर 17-21, 22-20, 21-14 अशी संघर्षपूर्ण मात केली. एक तास सात मिनिटे ही लढत रंगली होती.









