कोरियन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धा
सुन्चेऑन (दक्षिण कोरिया)
कोरिया खुल्या सुपर 500 आंतरराष्ट्रीय पुरूष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत शनिवारी भारताच्या पीव्ही सिंधू आणि किदांबी श्रीकांत यांचे एकेरीतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले.
भारताची माजी विश्वविजेती पीव्ही सिंधूने अलीकडेच स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवून कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता. महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात कोरियाच्या 20 वर्षीय ऍन सेयांगने पीव्ही सिंधूचा 48 मानिटांच्या कालावधीत 21-14, 21-17 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. सिंधूचा हा सेयांग कडून सलग चौथा पराभव आहे.
या उपांत्य लढतीत द्वितीय मानांकित सिंधूला कोरियाच्या सेयांगने आपल्या अचूक स्मॅश फटक्यावर चांगलेच दमविले. सेयांगने सिंधूवर 11-6 अशी आघाडी मध्यंतरी मिळविली. सेयांगने पहिला गेम 21-14 अशा फरकाने जिंकला. दुसऱया गेममध्ये सिंधूकडून सेयांगला बऱयापैकी प्रतिकार झाला. पण, सेयांगने हा दुसरा गेम 21-17 असा जिंकून या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
पुरूष एकेरीच्या उपांत्य सामन्यात इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीने भारताच्या किदांबी श्रीकांतचे आव्हान 50 मिनिटांच्या कालावधीत 21-19, 21-16 असे संपुष्टात आणत अंतिम फेरीत स्थान मिळविले. श्रीकांतने यापूर्वी विश्व बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले होते तर ख्रिस्तीने आशियाई स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले होते. इंडोनेशियाच्या ख्रिस्तीने विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या विश्व टूरवरील सलग दुसऱया स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे.









