
वृत्तसंस्था/ ओडेन्स, डेन्मार्क
भारताच्या महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू व आकर्षी कश्यप यांनी येथे सुरू झालेल्या डेन्मार्क ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली तर पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.
दोन वेळच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूला जागतिक क्रमवारीत 28 व्या स्थानावर असणाऱ्या स्कॉटलंडच्या किर्स्टी गिल्मूरवर विजय मिळविण्यासाठी 56 मिनिटे संघर्ष करावा लागला. सिंधूने ही लढत 21-14, 18-21, 21-10 अशी जिंकत दुसरी फेरी गाठली. गेल्या आठवड्यात सिंधूने आर्क्टिक ओपन स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. तिची दुसऱ्या फेरीची लढत सातव्या मानांकित इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंगशी होईल तुनजुंगने यावर्षी झालेल्या याआधीच्या गेल्या तीन लढतीत सिंधूला दोनदा हरविले आहे. मात्र एकंदर कामगिरी पाहता सिंधूने तिच्यावर 8-2 अशी आघाडी घेतली आहे.
आकर्षी कश्यपने मात्र पिछाडी भरून काढत जर्मनीच्या जागतिक 26 व्या मानांकित लि वायव्होनला पराभवाचा धक्का दिला. तिने ही लढत 10-21, 22-20, 21-12 अशी जिंकली. आकर्षीचाही पुढील सामना कठीण असून तिचा मुकाबला डावखुऱ्या थायलंडच्या सुपनिदा केटथाँगशी होणार आहे. जागतिक क्रमवारीत 19 व्या स्थानावर असणाऱ्या केटथाँगची आकर्षीविरुद्ध फक्त एकदाच गाठ पडली होती. यावर्षीच्या सिंगापूर ओपनमध्ये त्या एकमेकीविरुद्ध खेळल्या होत्या, त्यात केटथाँगने विजय मिळविला होता.
पुरुष एकेरीत 2021 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य जिंकणाऱ्या के. श्रीकांतला झुंजार लढतीनंतरही चीनच्या जागतिक 22 व्या मानांकित वेंग हाँग यांगकडून 21-19, 10-21, 16-21 असा पराभव स्वीकारावा लागला. अलीकडेच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष दुहेरीचे सुवर्ण जिंकणाऱ्या सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनी स्पर्धेतून माघार घेतल्याने त्यांचे मलेशियन प्रतिस्पर्धी आँग यू सिन व तेव एई यी यांना पुढे चाल देण्यात आली.









