वृत्तसंस्था/ बाली, इंडोनेशिया
भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्समध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रविवारी झालेल्या अंतिम फेरीत सिंधूला दक्षिण कोरियाच्या ऍन सेयुंगकडून पराभव पत्करावा लागला.
सिंधू ही विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन व दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती असून तिला या लढतीत सेयुंगच्या वेगाशी जुळवून घेता आले नाही आणि तिचा बचावही भेदण्यात तिला यश आले नाही. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असणाऱया सेयुंगने सिंधूवर 40 मिनिटांच्या खेळात 21-16, 21-12 अशी मात करून जेतेपद पटकावले. सिंधूने 2018 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. सेयुंगकडून झालेला सिंधूचा हा सलग तिसरा पराभव आहे. या यशाने सेयुंग ही वर्षअखेरीस होणारी फायनल्स स्पर्धा जिंकणारी दक्षिण कोरियाची पहिली खेळाडू बनली आहे. याशिवाय बालीमध्ये मिळविलेले तिचे हे सलग तिसरे जेतेपद आहे. याआधी तिने गेल्या दोन आठवडय़ात इंडोनेशिया मास्टर्स व इंडोनेशिया ओपन स्पर्धाही याच ठिकाणी जिंकल्या आहेत.
जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असणाऱया सिंधूने तिसऱयांदा या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. पण 2018 मधील यशाची पुनरावृत्ती करण्यात ती अपयशी ठरली. सेयुंगला 10 मॅचपॉईंट्स मिळाले होते. त्यापैकी दोन सिंधूने वाचवले. पण एक फटका नेटमध्ये मारल्यानंतर सेयुंगने जल्लोष सुरू केला. आता 12 डिसेंबरपासून स्पेनमधील हुएल्वा येथे होणाऱया वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणार आहे. ती या स्पर्धेची विद्यमान विजेती आहे.









