इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन : पहिल्याच फेरीत पराभूत, श्रीकांत, प्रणितही स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था/ जकार्ता
गतविजेत्या सायना नेहवालला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. पुरुष गटात अव्वल खेळाडू किदाम्बी श्रीकांत व वर्ल्ड चॅम्पियन कांस्यविजेता बीसाई प्रणित यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. पीव्ही सिंधूने मात्र विजयी सुरुवात करत दुसरी फेरी गाठली आहे.
बुधवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या सिंधूने जपानच्या आया ओहारीला 14-21, 21-15, 21-11 असे हरवले. ही लढत 61 मिनिटे चालली. या विजयासह तिने दुसऱया फेरीत प्रवेश केला असून तिची लढत जपानच्या सयाका ताकाहाशी होईल. सुरुवातीला ओहारीने पहिला गेम 21-14 असा जिंकत शानदार सुरुवात केली. पण, अनुभवी सिंधूने जोरदार पुनरागमन करत दुसरा गेम 21-15 असा जिंकला व सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. यानंतर, तिसऱया व निर्णायक गेममध्ये सिंधूने सुरेख खेळ साकारत तिला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. हा गेम तिने 21-11 असा जिंकत दुसऱया फेरीतील स्थान निश्चित केले.
सायनाची अपयशी कामगिरी कायम
गत आठवडय़ात झालेल्या मलेशियन मास्टर्स स्पर्धेतील पराभवानंतर गतचॅम्पियन असलेल्या सायनाकडून या स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण, सलामीच्या सामन्यात तिला जपानच्या सयाका ताकाहाशीने 19-21, 21-13, 5-21 असे नमवत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. नववर्षात दुसऱया स्पर्धेत सहभागी होताना पुन्हा सायनाला अपयशाचा सामना करावा लागला, हे तितकेच वास्तव ठरले आहे.
पुरुष गटात भारताचा अव्वल खेळाडू किदाम्बी श्रीकांतला इंडोनेशियाच्या हिरेन शुतावाटोने 21-18, 12-21, 14-21 असे नमवले. अन्य एका सामन्यात बीसाई प्रणितला चीनचा दिग्गज खेळाडू शेई युकीने 21-16, 18-21, 10-21 असे तर सौरभ वर्माला चीनच्या ल्यु झूने 21-17, 21-15 असे हरवले. तसेच मिश्र दुहेरीत प्रणव जेरी-एन सिक्की रेड्डी या जोडीला स्पर्धेबाहेरचा रस्ता धरावा लागला.