कावळेसादच्या दरीत पहिलीच मोहीम, 62 निसर्गप्रेमी, संशोधकांचा मोहिमेत सहभाग
11 मुलीही उतरल्या 500 फूट खोल दरीत, 55 प्रकारचे पक्षी, उभयचरांची झाली नोंद
तीस प्रकारचे चतूरही सापडले, अतिदुर्मिळ बारा तसेच 185 प्रकारच्या वनस्पती
घनदाट जंगलात घालवली एक रात्र, अनोळखी मासे, वनस्पतींच्या प्रजाती
शेखर सामंत / सिंधुदुर्ग
वैभवसंपन्न निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या आणि थंड हवेचं ठिकाण म्हणून विशेष प्रसिद्ध असलेल्या आंबोलीतील कावळेसाद खोऱ्यातील मोहीम अखेर यशस्वीरित्या पूर्ण झाली. कावळेसादच्या दऱ्या-खोऱ्यातून वाट काढत वैशिष्टयपूर्ण जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी सिंधूसह्याद्री ऍडव्हेंचर क्लबने आयोजित केलेल्या या मोहिमेची नुकतीच सांगता झाली. या मोहिमेत साधारणपणे 62 निसर्ग प्रेमी तसेच संशोधकांनी सहभाग घेतला. या मोहिमेचे वैशिष्टय म्हणजे आजपर्यंत इथल्या दऱ्याखोऱ्यांत कोणत्याही प्रकारचं संशोधन झालेले नाही. शिवाय आंबोलीतील कावळेसाद कड्यावरून रॅपलिंग करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने ही मोहीम सर्व निसर्ग अभ्यासक आणि निसर्गप्रेमी यांच्यासाठी विशेष महत्त्वाची होती.
या मोहिमेचे मुख्य आयोजक रामेश्वर सावंत आणि त्यांच्या सिंधू सह्याद्री ऍडव्हेंचर क्लबच्या सर्व टीमच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आखण्यात आली होती. कावळेसाद येथील जवळपास 500 फूट खोल दरीत निसर्ग अभ्यासक डॉ. योगेश कोळी, प्राणीशास्त्र विभाग आणि वनस्पती अभ्यासक डॉ. बाळकृष्ण गावडे, यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पक्षी, उभयचर, कीटक व वनस्पती यांच्या नोंदी करण्यात आल्या. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नातून आणि निरीक्षणातून या मोहिमेची शिरशिंगे गावात सांगता झाली.
खोऱ्यातील जलाशयात सापडले अनोळखी जातीचे मासे
डॉ. योगेश कोळी यांच्या मागदर्शनाखाली यावेळी अनेकविध मासे, कीटक, उभयचर आणि इतर प्रजातींची शोध मोहीम राबविण्यात आली. यात मुख्यत्वे माशांच्या इंडोरियनेक्टस ईवीझार्ड्डी, देवारिओ मलबॅरिका, मिस्टस मलबॅरिकस या प्रजातींसह काही अनोळख्या प्रजातीही पाहायला मिळाल्या. सोबतच कॅस्टल रॉक नाईट फ्रॉग, गोल्डन बॅक फ्रॉग, आंबोली बुश फ्रॉग या सारखे बेडूक, महाधनेश, मलबारी धनेश, मलबार कस्तुर, तलवार सात भाई आदी सुमारे 50 ते 55 प्रकारचे विविध पक्षी तसेच टनेल वेब स्पायडर, लाँग जॉ स्पायडर, फिश स्पायडर यासारख्या कोळ्याच्या प्रजाती व वांडरींग गलाइडर, ब्लॅक स्ट्रीम गलाइडर, क्रीमसंन मार्श गलाईडर यासारख्या जवळपास 30 चतुरांचीही या ठिकाणी नोंद करण्यात आली.
आंबोलीतील अशा अनोळखी जागांचा शोध घेऊन त्यांचा जैवविविधतेच्या दृष्टीने अभ्यास होणे गरजेचे असल्याचे डॉ. कोळी यांनी यावेळी म्हटले. दोन दिवसांच्या या शोध मोहिमेत अनेक युवा संशोधकांचेही मार्गदर्शन लाभले. यामध्ये प्रवीण सावंत यांनी पक्षी निरीक्षणावर सर्वांना माहिती दिली?, तर गुरुनाथ कदम यांनी मासे आणि उभयचर यांच्याविषयी सर्वांना सांगितले. यासोबतच अक्षय दळवी, तेजस सावंत, मयुरी चव्हाण यांनी विविध प्रकारचे कोळी, कीटक यांच्याविषयी सर्वांना माहिती दिली.
अतिदुर्मिळ बारा वनस्पतींबरोबरच अनोळखी वनस्पती
प्राणी वैविध्यतेसोबत वनस्पती अभ्यासक डॉ. बाळकृष्ण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली 185 वनस्पतींची नोंद कावळेसाद दरीतील सदाहरीत जंगलातून करण्यात आली. यामध्ये बारा वनस्पतींचा आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेच्या लाल सूचीत (Red List of Threatened vascular plant species) मध्ये समावेश असून त्यामध्ये चांदाकोचा, चानपाटा, भीमाची वेल, काळीनो, ऊमळी, हारपुली, रानबीब्बा, कडू कवठ, खाजकुवली, आंबेरी, ओलॅक्स सीटोकोरम, हूम व साजेरी अशा एकूण 12 वनस्पतींचा समावेश आहे. याबरोबरच हापुली व देवजांभूळ या वनस्पती प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नोंदविल्या गेल्या आहेत.
साधारणतः सोळाव्या शतकाच्या मध्यापासून ते आजमितीस पर्यंत प्रकाशित झालेल्या वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथात कावळेसाद दरीतील वनस्पती सर्वेक्षणाच्या नोंदी सापडत नसून 25 ते 27 डिसेंबर दरम्यान राबविलेल्या मोहिमेंतर्गत झालेले वनस्पती सर्वेक्षण हे प्रथमच झाले व ते करण्याकामीचे श्रेय हे रामेश्वर सावंत यांना जाते. हे सर्वेक्षण करण्याची संधी कावळेसाद कडा रॅपलिंग करीत दरीत उतरून करण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्य समजतो. नजीकच्या काळात या ठिकाणी अधिक संशोधन होणे आवश्यक असल्याचे डॉ. गावडे यांनी यावेळी नमूद केले.
गेल्या महिन्याभरापासूनच निसर्ग अभ्यासक आणि निसर्ग प्रेमींना उत्कंठा लागलेली मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आता जगभरातील संशोधकांची या ठिकाणी जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. विशेष म्हणजे स्थानिक युवा संशोधकांनी या मोहिमेत सहभाग घेतल्यामुळे याला एक वेगळच महत्त्व प्राप्त झालं होतं. येत्या काळात सिंधुदुर्गातील युवा पिढी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जाऊन अनेक नवनवीन गोष्टीचा उलगडा करेल व त्यातून पश्चिम घाट आणि इथला इतिहासचे साक्षीदार असलेले गड-किल्ले यांचे जतन व संवर्धन होईल हे नक्की!
स्थानिकांचे सहकार्य
कावळेसाद खोऱ्यातील या अभिनव साहसी मोहिमेच्या यशामागे स्थानिक लोकांनीही मोलाचे सहकार्य केले. चौकुळचे (गोवा कार्यरत) बी. आर. गावडे, आंबोलीचे हेमंत परब, गेळे येथील मोहनकाका गवस, श्रीकृष्ण उर्फ गुरू गवस, शिरशिंगे गोठवे वाडीतील सुभाष उर्फ बाबू सुर्वे, जीवन लाड, मळईवाडी येथील ग्रामस्थ, माधव कारेकर टीम यांचे बहुमोल सहकार्य लाभले. ज्यामुळे या कावळेसाद मोहिमेच्या यशाचा आनंद दुणावला.
खरं तर गिर्यारोहणासारख्या साहसी जोखीमभऱ्या क्रीडा प्रकारात तनामनाने खूपच कष्ट घ्यावेच लागतात. प्रत्येकाच्या मानसिक-बौद्धिक-शारीरिक क्षमतेचा पुरेपूर कस लागतो. या, मोहिमेत जिल्ह्यातीलच प्रतीक गुरव, विशाल उपाध्याय, समीर वायंगणकर, किरण राणे, हर्ष उपाध्याय, निनाद खोत या युवा गिर्यारोहकांनी शतप्रतिशत मेहनत करून मोहिमेचे नेता रामेश्वर सावंत यांच्या प्रत्येक सूचनेनुसार ही कठीण जबाबदारी चोख पार पाडून मोहीम सुरक्षितरीत्या यशस्वी केली. मोहिमेचे अजून एक वैशिष्टय म्हणजे, अकरा मुलींनी या मोहिमेत सहभाग नोंदवला.








