यशवंत पंचायत राज अभियान : पंचायत समिती स्तरावर कुडाळ प्रथम
प्रतिनिधी / ओरोस:
यशवंत पंचायत राज अभियान (2020-21) अंतर्गत कामकाजाबाबत करण्यात आलेल्या मूल्यांकनात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कोकण विभागात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. सलग चौथ्या वर्षी जि. प. ला हा मान मिळाला आहे. पंचायत समितीस्तरावर कुडाळ पंचायत समितीला प्रथम क्रमांक मिळाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. समिधा नाईक यांनी शनिवारी दिली.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधून चालणाऱया योजना व कामकाजाची पडताळणी कोकण विभागीय समितीमार्फत केली जाते. यामध्ये सभा कामकाज, प्रलंबित प्रकरणे, अभिलेख, कर्मचाऱयांच्या तक्रारी, निवृत्ती वेतन प्रकरणे, नागरिकांच्या तक्रारी, कर्मचाऱयांची विभागीय चौकशी, गैरहजेरी आदीबरोबरच प्रशासकीय कामकाज, खर्च, आयएसओ मानांकन, फायर ऑडिट, पुरस्कार, संगणकीकरण, इंटरनेट सुविधा, विविध योजना राबविण्याची पद्धत यासह अन्य काही बाबींचे मिळून 300 गुणांचे मूल्यांकन केले जाते. ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्हय़ांच्या करण्यात आलेल्या मूल्यांकनात कोकण विभागात सिंधुदुर्ग जि. प. ला अव्वल स्थान मिळाले आहे. यापूर्वी सलग तीन वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कोकण विभागात अव्वल ठरली आहे.
कोकण विभागात प्रथम आलेल्या जि. प. आणि कुडाळ पंचायत समिती यांचे आता राज्यस्तरीय समितीकडून मूल्यांकन केले जाणार आहे. यासाठी लवकरच राज्यस्तरीय पडताळणी समिती जिल्हय़ात दाखल होणार असल्याचे जि. प. अध्यक्षांनी सांगितले.
2018-19 या वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली होती. 2017-18 साली राज्यात द्वितीय, तर सलग तीनवेळा राज्यात तिसरा क्रमांक सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला मिळाला होता. आता राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेला केवळ राज्यस्तरावरच रोख बक्षीस दिले जाते. पंचायत समित्यांना मात्र विभागस्तरावर रोख रकमेचे बक्षीस दिले जाते. कुडाळ पंचायत समितीने कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावल्याने या पं. स. ला 20 लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.









