सिंधुदुर्ग/प्रतीनिधी
सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ उद्घाटन समारंभात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीयमंत्री नारायण राणे हे अनेक दिवसांनी एकाच मंचावर पाहायला मिळाले. यावेळी दोन्ही नेते काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं. कार्यक्रमावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार शाब्दिक टोलेबाजी पाहायला मिळाली. नारायण राणेंनी भाषणात सिंधुदुर्गचा विकास मीच केला असं म्हंटलं. दरम्यान, नारायण राणे यांनी केलेल्या भाषणानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या भाषणातून जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे दिसून आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोलेबाजी केली. “जे काही आधी बोलून गेले आहेत विकासाच्या गोष्टी त्या मी परत नाही सांगणार. पण जेव्हा मी एरियल फोटोग्राफी करत होतो, महाराजांचे किल्ले, आता किल्ले म्हणजे … माझा समज असा आहे की, निदान सिंधुदुर्ग किल्लातरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. नाही कोणतरी बोलेल मीच बांधला.” असंही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं.
मुख्यमंत्री भाषणात म्हणाले, “आजचा क्षण मला वाटतं आदळ आपट करण्याचा नाही. तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. ज्योतिरादित्यजी मी तुमचं खास अभिनंदन करतोय. कारण तुम्ही इतकं लांब राहून देखील मराठी मातीचा संस्कार विसरला नाही. माती एक संस्कार असतो, मातेचा एक संस्कार असतो आणि मातीच्या वेदना काही वेळेला मातीच जाणते. अनेक झाडं उगवतात त्यात काही बाभळीचे असतात, काही आंब्याचे असतात आता बाभळीची झाडं उगवली तर माती म्हणणार मी काय करू? जोपासावं लागतं. माझ्यासाठी हा मोठ्या सौभाग्याचा दिवस आहे. कारण, शिवसेना आणि कोकण हे नातं मी काय तुम्हाला सांगायला नको. अनेकदा मी म्हटलेलं आहे की कुठेही न झुकणारं मस्तक ते या सिंधुदुर्गात कोकणवासियांसमोर नतमस्तक झालं ते शिवसेनाप्रमुख.” तसेच, “कोणी काय केलं, कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. मी त्या विषयावर बोलायचं तर खूप बोलता येईल, बोलेनही कदाचित पण आजचा हा महत्वाचा दिवस आहे. असे ते म्हणाले.