गोव्याकडून होणारा पुरवठा थांबला : कोल्हापूरकडून होणाऱया पुरवठय़ावरही मर्यादा
- ऑक्सिजनची गरज लागणाऱया रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ
- ऑक्सिजन मिळविण्यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न
- जिल्हय़ाला ऑक्सिजन कमी पडू देणार नाही – जिल्हाधिकारी
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
ऑक्सिजनची आवश्यकता भासणाऱया रुग्णांची दिवसागणिक वाढत जाणारी संख्या व संपूर्ण देशभर ऑक्सिजनचा जाणवू लागलेला भीषण तुटवडा याचा जबरदस्त फटका सिंधुदुर्गला बसण्याची दाट शक्यता आहे. गोव्याकडून होणारा ऑक्सिजनचा पुरवठा जवळपास बंद झाला असून कोल्हापूरकडून होणाऱया पुरवठय़ावर देखील मर्यादा आल्या आहेत. अशाही परिस्थितीत जिल्हा प्रशासन व या जिल्हय़ातील प्रमुख लोकप्रतिनिधी आपल्या जिल्हय़ाला ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत.
कोरोनाच्या या युद्धात औषधोपचारांपेक्षाही आता रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी ऑक्सिजनला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे. सध्या ऑक्सिजनची गरज भासू लागलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण एवढे वाढू लागले आहे की, त्यामुळे ऑक्सिजन उत्पादकांचे धाबे दणाणले आहेत. ऑक्सिजनचे उत्पादन आणि गरज यामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे ज्या जिल्हय़ांमध्ये ऑक्सिजनचे प्लांट नाहीत व ज्यांना अन्य जिल्हय़ातील वा प्रदेशातील ऑक्सिजन उत्पादकांवर अवलंबून राहवे लागते, अशा जिल्हय़ांना आता ऑक्सिजन आणीबाणीला सामोरं जावं लागतय की काय, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
तर ऑक्सिजन ‘आणीबाणी’
आपला सिंधुदुर्ग या ऑक्सिजन आणीबाणीच्या अगदी उंबरठय़ावर येऊन ठेपला आहे. लगतच्या जिल्हय़ांची स्थितीही जवळपास अशीच आहे. गोव्यालाही ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्याने त्यांना नाईलाजास्तव सिंधुदुर्गचा पुरवठा थांबवावा लागला आहे. गोव्याप्रमाणेच आपणास कोल्हापूर येथील पुरवठादारांकडून ऑक्सिजनचा पुरवठा होतो. परंतु, कोल्हापूरकरांनादेखील आता ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू लागल्याने सिंधुदुर्गच्या पुरवठय़ावर मर्यादा येऊ लागल्या आहेत. त्यामुळे ऑक्सिजनच्या तुटवडय़ाचे मोठे संकट सिंधुदुर्गच्या दारात येऊन ठेपले आहे.
ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न
दरम्यान, या संकटावर मात करण्यासाठी या जिल्हय़ात ऑक्सिजन रिफिलिंग प्लांट उभारण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी खासगी तत्वावर हा प्लांट उभा करण्यासाठी पुढे आलेल्या उद्योजकाला कुडाळ एमआयडीसी परिसरात भूखंड उपलब्ध करून देण्यासाठी आमदार वैभव नाईक व जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. भूखंड मिळवून देण्याची ही प्रक्रिया तात्काळ व्हावी, यासाठी आमदार नाईक यांनी उद्योगमंत्र्यांना साकडे घातले असून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी एमआयडीसीच्या सीईओंशी संपर्क साधून आहेत. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून या प्लांटसाठी योग्य व अनुरुप असा भूखंड मिळाला, तर या प्लांट उभारणीच्या कामास गती मिळण्याची दाट शक्यता आहे. परंतु, सर्वकाही मनाप्रमाणे झाले, तरी हा प्लांट परिपूर्ण होऊन पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्यासाठी किमान तीन महिने तरी लागणार आहेत. म्हणजे कोरोनाच्या तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी आपणास या प्लांटचा उपयोग होणार आहे. सध्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी आपणास अन्य मार्गाने उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
ऑक्सिजन पुरवठा कमी पडू देणार नाही – के. मंजुलक्ष्मी
या आणीबाणीच्याप्रसंगी जिल्हय़ाच्या दारात आ वासून उभ्या असलेल्या या संकटाबाबत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र परिस्थिती कितीही गंभीर असली, तरी आपल्या जिल्हय़ाला ऑक्सिजनचा तुटवडा कमी पडू देणार नाही, असे त्या म्हणाल्या. परिस्थिती खूप गंभीर आहे. आम्ही रात्रंदिवस ऑक्सिजनसाठी प्रयत्न करीत आहोत. लगतच्या जिल्हाधिकाऱयांशी संपर्क ठेवून आहोत व मिळतील तसा तेथून ऑक्सिजनचा पुरवठा मिळवत आहोत. सर्व आमदार, खासदार, पालकमंत्र्यांचे या कामी उत्तम सहकार्य मिळत असल्याचेही त्या म्हणाल्या. थोडक्यात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मिळून आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीनिशी यातून पर्याय उपलब्ध करून देण्याच्या कामाला लागलो असल्याचे त्या म्हणाल्या. सध्या जिल्हा कोविड रुग्णालयात एक छोटा ऑक्सिजन प्लांट कार्यरत असून, दुसरा प्लांट येत्या काही दिवसांत कार्यान्वित होणार आहे. तसेच कुडाळ महिला रुग्णालय परिसरातदेखील छोटा ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, या छोटय़ा प्लांटनी सध्याची गरज भागणार नसून त्यासाठी आपणास अन्य प्रांतातील ऑक्सिजन उत्पादकांवर अवलंबून राहवे लागणार असल्याचे त्या म्हणाल्या. या आणीबाणीच्या प्रसंगी जनतेने संयम बाळगून आम्हाला सहकार्य केले, चांगली साथ दिली, तर निश्चितपणे आपण या संकटावर मात करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.









