कुलगुरू पेडणेकर यांची माहिती
संतोष सावंत / सावंतवाडी:
कोकणात आणि विशेषत: सिंधुदुर्गात समुद्र जैवविविधतेबाबत अभ्यासासाठी फिशरीज व बायोडायव्हर्सिटी अभ्यासक्रम केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी वेंगुर्ले येथे जागा निश्चित करण्यात आली आहे. येत्या जूनपर्यंत नवीन अभ्यासक्रम सुरू करणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी दिली.
महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील मत्स्यविभाग, जैवविविधतेकडे विशेष लक्ष देण्याच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांना गती देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवार विद्यापीठाचे कुलगुरू पेडणेकर कोकण दौऱयावर आले होते. त्यांनी तळेरे, वेंगुर्ले, झाराप या ठिकाणच्या विद्यापीठाच्या प्रस्तावित जागेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत विद्यापीठाच्या अनुराधा मुजूमदार, आमदार दीपक केसरकर, राजेश खराज, अजय भांबुरे, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, आनंद सामंत, महेश तानावडे उपस्थित होते.
पेडणेकर म्हणाले, मुंबई विद्यापीठातर्फे येत्या शैक्षणिक वर्षापासून विविध व्यवसायभिमुख नवीन अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. कुठल्या भागात कोठे अभ्यासक्रम सुरू करता येऊ शकतात, त्यादृष्टीने चाचपणी सुरू आहे. कोकणला समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. त्यामुळे विद्यापीठाने फिशरीज व बायोडायव्हर्सिटी अभ्यासक्रम हाती घेण्याचे ठरविले आहे. त्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले येथे येत्या जूनपासून अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.
पेडणेकर म्हणाले, विद्यापीठाचे उपकेंद्र कोकणात सिंधुदुर्गात कुडाळ-झाराप येथे निश्चित करण्यात आले आहे. हे केंद्र येत्या दोन-तीन महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. झाराप येथील जागा निश्चित झाली आहे. या जागेत इमारत उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. जूनमध्ये नवीन अभ्यासक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.









