कोल्हापूर, रत्नागिरीपेक्षा दहा हजार कमी : नर्सेसनी मांडली आमदार राणेंकडे कैफियत
प्रतिनिधी / कणकवली:
जिल्हय़ात आरोग्य सेवा देणाऱया प्रत्येक नर्सला प्रतिमहिना दहा हजार रुपये कमी पगार दिला जातो. कोल्हापूर, रत्नागिरीमध्ये नर्सना 30 हजार पगार दिला जातो तर आपल्याकडे या नर्सना 20 हजार पगार दिला जात आहे. येथे ठेकेदार नाहीत तर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयाकडून थेट पगार दिला जातो. याबाबत नर्सेसनी आपल्या मागण्या व समस्यांचे निवेदन आमदार नीतेश राणे यांची भेट घेऊन दिले व आपली कैफियत मांडली आहे.
कोरोनाकाळात तात्पुरत्या स्वरूपात सेवेसाठी घेतलेल्या नर्सना कमी पगार देण्याचा प्रकार म्हणजे निःस्वार्थ सेवा देणाऱया नर्सना ठकविण्याचा प्रकार आहे. जिल्हय़ात 60 नर्स कोरोनाकाळात सीसीसी सेंटर आणि तालुकानिहाय काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या असून त्यांना 11 महिन्याची कामगिरी देण्याचा नियम असतांना 2 किंवा 3 महिन्याची कामगिरी दिली जाते. यासंदर्भात मागण्या व समस्यांचे निवेदन आमदार राणेंना देऊन चर्चा करण्यात आली. दरम्यान, यासंदर्भात आमदार नीतेश राणे यांनी आरोग्य विभागाला जाब विचारणार असल्याचे स्पष्ट केले आहे.









