प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यूपीएससी परीक्षेत सिंधुदुर्गचा सुपुत्र सुब्रमण्य केळकर याने सलग दुसऱया वेळी ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावला. सुब्रमण्यची केरळ केडरमध्ये आय. पी. एस. अधिकारी म्हणून यापूर्वीच निवड झाली आहे. मात्र आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन त्याने पुन्हा एकदा ही परीक्षा दिली. मात्र दुर्देवाने त्याला पूर्वीएवढी रँक न मिळाल्याने त्याचे आय. ए. एस. चे स्वप्न अद्याप साकार होणे शक्य नाही.
दरम्यान सुब्रमण्यकडे या परीक्षेसाठी आणखी एक संधी उपलब्ध असून पुढील महिन्यात होणाऱया यूपीएससी परीक्षेत तो आयएएससाठी शेवटचा प्रयत्न करणार आहे. त्यात जर यश नाही आलं, तर तो आपले आयपीएसचे ट्रेनिंग सुरू करणार आहे.
अतिशय प्रतिकुल परिस्थितीत जिद्ध, कष्ट व इच्छाशक्तीच्या बळावर सुब्रमण्यने मागील यूपीएससी परीक्षेत यश मिळवत देशात 497 वी रँक मिळवली होती. त्यामुळे त्याला तामिळनाडू केडरमध्ये आय. पी. एस. अधिकारी म्हणून संधी मिळाली होती. यूपीएससीच्या आणखी एका प्रयत्नात आता त्याला देशात 653 वी रँक प्राप्त झाल्याने त्याची आय. ए. एस. साठी निवड झाली नाही. मात्र तो अजून एक प्रयत्न करणार आहे. सुब्रमण्यला पूर्वी एवढे गुण मिळाले नाहीत, तरी यू. पी. एस. सी. चे शिवधनुष्य दोनवेळा पेलणे ही गोष्ट अजिबात सोपी नाही. सुब्रमण्यने मिळविलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.









