कुडाळच्या प्रशांत तायशेटे यांचा बीएमसीचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात सिंहाचा वाटा : पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी बसविले फ्लड गेटस् : बांद्रय़ाचा कलानगर परिसर तुंबण्यापासून वाचला
अर्जुन राणे / कुडाळ:
‘पावसामुळे मुंबईची तुंबई’ होण्याचे प्रकार गेली अनेक वर्षे मुंबईत पाहायला मिळत आहेत. त्यामुळे समस्त मुंबईकरांची दैना होते. यावर्षी मात्र बांद्रय़ाच्या कलानगर (पूर्व) परिसरासह तेथील 15 ठिकाणे तुंबई होण्यापासून वाचली आहेत. मुंबई महानगरपालिके (बीएमसी) ने या परिसरातील तुंबलेल्या पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी मिठी नदीवर तब्बल सहा ठिकाणी फ्लड गेटस् (पूरनियंत्रण झडपा) बसविले आहेत. त्यामुळे या परिसरात पाणी तुंबले नाही. हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे, ती सिंधुदुर्गचे सुपुत्र, बीएमसीच्या पर्जन्य जलवाहिन्या (पजवा) विभागाच्या प्रशालन व परीक्षणाचे (प्रवप) उपप्रमुख अभियंता प्रशांत कृष्णा तायशेटे यांनी.
प्रशांत तायशेटे हे मूळ कोचरे (ता. वेंगुर्ले) येथील रहिवासी परंतु त्यांचे कुटुंब कुडाळ येथे स्थायिक आहे. प्रशांत हे कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे स्कॉलर विद्यार्थी होते. अभिनय क्षेत्राचीही त्यांना आवड आहे. इंजिनिअरिंग करून ते मुंबई महानगरपालिकेत रुजू झाले आणि यशाची अनेक शिखरे त्यांनी काबिज केली.
मुख्यमंत्र्यांच्या ‘होम ग्राऊंड’वरच पाणी तुंबायचे
वांद्रे कलानगर म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानचा परिसर. या भागातील मिठी नदी मुसळधार पडणाऱया पावसामुळे दरवर्षी धोक्याची पातळी ओलांडते. त्यामुळे कलानगर व परिसरात मोठय़ा प्रमाणात पाणी तुंबते. मुख्यमंत्र्यांच्या होम ग्राऊंडवरच अशी अवस्था होत असल्याने शिवसेनेला विरोधकांकडून टिकेचे लक्ष्य केले जायचे.
यावर्षी कलानगर परिसराला फटका बसला नाही
तत्कालीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी याबाबत केलेल्या पाठपुराव्यानंतर मिठी नदीला यावर्षी झडपा बसविण्यात आल्या. या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी तब्बल चार महिने लागले. बीएमसीच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या मेकॅनिकल सेक्शनचे उपप्रमुख अभियंता प्रशांत तायशेटे यांच्या नेतृत्वाखाली प्रवप (पजवां)चे सहाय्यक अभियंता भरत वा. बांबळे, कनिष्ठ अभियंता रवींद्र अ. सिडाम व त्यांच्या सहकाऱयांनी हा प्रकल्प यशस्वी केला. पालिकेने पावसाळय़ापूर्वी मिठी नदीला सायन, धारावी, बीकेसीसह सहा ठिकाणी पूरनियंत्रण झडपा बसविल्या आहेत. त्यामुळे कलानगर, सरकारी वसाहत, गांधीनगर, खेरनगर, जयहिंदनगर, जवाहरनगर, इंदिरानगर, मराठा कॉलनी, पटेलनगर, हनुमान टेकडी, गोळीबार, डवरीनगर येथील सखल भागात पाणी तुंबण्याची समस्या दूर होणार असल्याचा दावा बीएमसीतर्फे करण्यात आला आहे. 5 ऑगस्टला मुंबईत 300 मिमी पाऊस पडला. त्यावेळी उर्वरित मुंबई जलमय झाली असताना या झडपांमुळे कलानगर व आसपासच्या परिसरात पाणी तुंबले नाही, असे बीएमसीतर्फे सांगण्यात आले.
सुमारे 10 कोटी रुपये खर्च
मोठय़ा भरतीच्या वेळेत जास्त पाऊस झाल्यास हा परिसर जलमय होत होता. पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागत होता. त्यामुळे यावर्षी पावसाळय़ापूर्वी एकूण 11 मृदू पोलादी पेनस्टॉक प्रकारची गेटस् व स्टेनलेस स्टील चौकटी, इलेक्ट्रिक ऍक्यूएटरसहीत पातमुखांवर बसविण्यात आली. त्यामुळे नदीच्या पाण्याचा उलट प्रवाह भरतीच्यावेळी या भागातील पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये प्रतिबंधित केला गेला. तसेच भरतीच्यावेळी पाऊस झाला, तर पाण्याचा उपसा करण्यासाठी 18 उंदंचन संच बसविण्यात आले. तसेच 50 हॉर्स पॉवरचे पंप बसविण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 10 कोटी रुपये खर्च आला आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे या परिसरात आता पाणी तुंबणार नाही, असे उपमुख्य अभियंता प्रशांत तायशेटे यांनी सांगितले. तायशेटे हे माजी गटविकास अधिकारी कै. कृष्णा तायशेटे यांचे सुपुत्र, तर जिल्हा सरकारी वकील संदेश तायशेटे, उमेश तायशेटे, ब्रिजेश तायशेटे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. प्रशांत यांचे बालपण कुडाळ परिसरातच गेल्यामुळे त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.









