50 बेडचे विशेष डेडिकेटीव्ह कोविड हॉस्पिटल मंजूर : गृहनिर्माणमंत्र्यांची विशेष भेट
- राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रयत्नांना मोठे यश
- गृहनिर्माणच्या निधीतून उभं राहणार राज्यातील पहिलं कोविड हॉस्पिटल
- जिल्हा क्रीडा संकुलातील पॅव्हेलियन हॉलमध्ये उभे राहणार हॉस्पिटल
वार्ताहर / सावंतवाडी:
रेडझोनमध्ये गेलेल्या सिंधुदुर्गच्या मदतीला आता कोकण-म्हाडाने धाव घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विशेष आदेशातून कोकण-म्हाडाने सिंधुदुर्गात महाराष्ट्रातील पहिले डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल उभारण्याच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली आहे. सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा संकुलातील पॅव्हेलियन हॉलच्या इमारतीत ऑक्सिजन बेड आणि व्हेन्टिलेटर्ससह 50 बेडचे हे सुसज्ज कोविड हॉस्पिटल येत्या 15 दिवसांत उभे राहाणार आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
रेडझोनमध्ये गेलेल्या सिंधुदुर्गात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या मानाने आरोग्य सुविधा अपुऱया पडू लागल्या आहेत. रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून मिळणे खूपच कठीण होऊन बसले आहे. अशा अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना आपल्या गृहनिर्माण खात्यामार्फत आपल्या या जिल्हय़ासाठी काहीतरी करा, अशी गळ घातली होती व किमान 50 बेडचे अद्ययावत कोविड हॉस्पिटल उपलब्ध करून द्या, अशी मागणी करून तसा प्रस्तावही दिला होता. या प्रस्तावास अनुसरून आव्हाड यांनी विशेष बाब म्हणून सिंधुदुर्गवासीयांसाठी कोकण-म्हाडातर्फे राज्यातील पहिले कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आणि त्याला अंतिम स्वरुप देऊन मंजुरीही दिली.
मुंबईतून कोविड रुग्णालय मंजुरीचे पत्र घेऊन सिंधुदुर्गात पोहोचताच सामंत यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषद घेऊन सिंधुदुर्गवासीयांसाठी ही आनंदाची बातमी दिली.
विशेष बाब म्हणून हॉस्पिटल मंजूर
सामंत म्हणाले, खरं तर गृहनिर्माण खाते आणि आरोग्य खाते याचा थेट असा काहीच संबंध येत नाही. परंतु, सिंधुदुर्गातील जनता संकटात सापडल्याची बाब गृहनिर्माण मंत्र्यांच्या निदर्शनास आणल्यावर त्यांनी खात्याच्या चाकोरीबाहेर जाऊन हा निर्णय घेतला. यात विशेष आभार मानले पाहिजेत, ते जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक दाभाडे यांचे. त्यांनी जलदगतीने अत्यंत सुंदर असा कोविड रुग्णालयाचा प्रस्ताव तयार करून दिल्याने आपणास त्याचा पाठपुरावा करणे सोपे गेले. यात आणि एक अत्यंत चांगली मदत झाली ती पालकमंत्री उदय सामंत यांची. त्यांनी जिल्हय़ाच्यावतीने त्वरित या प्रस्तावास हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर राज्यातील या पहिल्या विशेष अशा प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली आणि त्यास अखेर हिरवा कंदील मिळाला. मंगळवारी सायंकाळी उशिरा गृहनिर्माणमंत्र्यांनी या प्रस्तावावर खात्याच्यावतीने मंजुरीबाबत अंतिम सहय़ा केल्या व हा मंजुरीचा प्रस्ताव खात्याचे प्रधान सचिव श्रीनिवासन यांच्याकडे सोपवल्याचे त्यांनी सांगितले.
पंधरा दिवसांत हॉस्पिटल उभारणार
या कोविड हॉस्पिटलबाबत अधिक माहिती देताना सामंत म्हणाले, सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कोविड रुग्णालयानजीकच्या क्रीडा संकुल हॉल इमारतीत हे हॉस्पिटल उभे राहणार आहे. पहिल्या टप्प्यात त्यामध्ये 50 बेडची व्यवस्था करण्यात येणार असून त्यात पाच व्हेन्टिलेटर बेड, तर दहा ऑक्सिजन बेड उपलब्ध राहणार आहेत. पुढच्या टप्प्यात ही संख्या वाढवण्यात येणार आहे. येत्या आठवडाभरात या इस्पितळासाठी लागणारे सर्व अत्यावश्यक साहित्य जिल्हय़ाला प्राप्त होणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयातर्फे पुढील पंधरा दिवसांत या इस्पितळाची उभारणी होणार आहे. या रुग्णालयासाठी लागणारे डॉक्टर, कर्मचारीवर्ग व व्यवस्थापन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही पूर्णपणे जिल्हा प्रशासन व जिल्हा रुग्णालयाची राहणार आहे. गरज पडल्यास कोरोनाच्या तिसऱया लाटेत मुलांसाठीच्या रुग्णालयात त्याचे रुपांतर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
सिंधुदुर्गात उभारण्यात येणाऱया या कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले. सावंतवाडी येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काका कुडाळकर, अमित पिळणकर, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, दर्शना देसाई, अशोक पवार, शकिफ खान, बाळा कनयाळकर, शिवाजी घोगळे, रुपेश जाधव, सुनिल भोगटे, हर्शद बेग, असिफ खान, जहिरा खान आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
तज्ञ डॉक्टर, कर्मचाऱयांसाठी विशेष प्रयत्न करणार
जिल्हय़ात तज्ञ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱयांची कमतरता असताना हे नवीन हॉस्पिटल चालवणार कसे, असा सवाल केला असता सामंत म्हणाले, यासाठी आपण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. ज्या पद्धतीने नुकत्याच येऊन गेलेल्या तौक्ते वादळात उद्ध्वस्त झालेल्या सिंधुदुर्गातील विद्युत यंत्रणा त्वरित सावरण्यासाठी राज्यातील इतर जिल्हय़ांतून विद्युत खात्याचे इंजिनिअर्स व कर्मचारी पाठविण्यात आले, त्याच धर्तीवर रेडझोनमध्ये गेलेल्या या जिल्हय़ाला या रेडझोनमधून बाहेर काढण्यासाठी किमान दोन ते तीन महिन्यांकरिता राज्याच्या उर्वरित भागातून तज्ञ डॉक्टर व कर्मचारी पुरवण्याचा आग्रही प्रस्ताव आपण ठेवला आहे. त्याला आरोग्य मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहितीही त्यांनी दिली. हॉस्पिटलबाबतचा अविश्वसनीय वाटणारा प्रस्ताव जसा मंजूर करून आणला, तशाच प्रकारे तज्ञ डॉक्टर व कर्मचारीदेखील या जिल्हय़ासाठी मिळवून देण्याचा विश्वास सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.









