हा मासा करतो पाण्याऐवजी चक्क जंगलातून प्रवास : अंडी देण्यासाठी हे मासे जातात उंच-उंच पर्वतांवर
- मनोहर गडाच्या माथ्यावर नुकताच सापडला हा मासा
- जमिनीखाली राहू शकतो तो अन्न-पाण्याविना
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
मासा आणि पाणी यांचं एक अतूट नातं असतं. पाण्याशिवाय मासा क्षणभरही जगू शकत नाही, हे सर्वांना माहीत आहे. परंतु, नदी आणि पाण्याऐवजी जमिनीवरून, घनदाट जंगलातून, उभ्या कडय़ावरून उंचउंच पहाडापर्यंत प्रवास करणारेदेखील मासे असतात, असं जर कोणी तुम्हाला सांगितलं, तर त्यावर तुम्ही विश्वास ठेवायला तयार आहात का?
तुम्ही नाही म्हटलं, तरी आता तुम्हाला हा विश्वास ठेवावाच लागणार आहे. कारण सिंधुदुर्गच्या अद्भूत अशा जैवविविधतेत अशा प्रकारच्या विस्मयकारी माशांचे अस्तित्व सापडून आले आहे. समुद्र सपाटीपासून तब्बल 2000 फूट उंचावरील ऐतिहासिक मनोहर गडावर पाण्याचा कुठलाही सोर्स उपलब्ध नसताना या माशाचे अस्तित्व आढळून आले आहे. ‘इल’ वर्गातील हा मासा असून तो ‘बॉम्बे स्वॅम्प इल’ नावाने ओळखला जातो. तर स्थानिक भाषेत त्याला ‘पायटोप्या’ म्हणून ओळखले जाते.
कणकवली येथील विद्यामंदीर हायस्कूलचे विज्ञान शिक्षक पृथ्वीराज बर्डे यांना हा दुर्मिळातील दुर्मिळ असा आणि नष्ट होण्याच्या मार्गावर असलेला मासा सापडला. काही दिवसांपूर्वी बर्डे हे सहकाऱयांसह ऐतिहासिक मनोहर गडावर गेले असता गडाच्या माथ्यावरून मनसंतोष गडाच्या सुळक्याच्या दिशेने जात असताना त्यांना तेथील गवतामध्ये हा अद्भूत मासा सापडून आला. सुरुवातीला त्यांना तो साप प्रजातीतील ‘वाळा’ साप असल्याचे वाटले. परंतु, त्याला हातात घेताच नंतर तो गांडूळासारख्या दिसणाऱया सिसेलीयन बेडकाप्रमाणे वाटला. परंतु, शेपटी काहीशी माशासारखी असल्यामुळे त्याचे अत्यंत जवळून व्हीडिओ घेऊन त्याला काळजीपूर्वक त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
बर्डे यांनी महाराष्ट्रातील अनेक जीवतज्ञांना हा व्हीडिओ पाठवून माहिती घेतली असता, तो ‘इल’ प्रजातीतील मासा असल्याचे स्पष्ट झाले. गडाच्या पायथ्याशी राहणाऱया स्थानिक ग्रामस्थांनी देखील त्याला दुजोरा दिला. पाण्याएवढाच पाण्याबाहेर राहू शकणाऱया या माशाला स्थानिक भाषेत ‘पायटोप्या’ म्हणून ओळखले जात असल्याचे समजले.
या माशाबद्दल मिळालेली माहिती अशी की, हा मासा ‘इल’ कुळातील असून तो ‘बॉम्बे स्वॅम्प इल’ या नावाने ओळखला जातो. सहय़ाद्रीच्या पट्टय़ात महाबळेश्वर तसेच कोयना नगरच्या परिसरात या अनोख्या माशाचे अस्तित्व यापूर्वी सापडून आले होते. 1980 नंतर हा माशाचे अस्तित्व हळूहळू कमी होत गेले व त्यानंतर नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या ‘रेड लिस्ट’मध्ये या माशाचा समावेश झाला. सहय़ाद्रीच्या पायथ्याशी राहणाऱया ग्रामस्थांना या माशाबद्दल माहिती होती. परंतु सिंधुदुर्गच्या जैवविविधतेमध्ये अलिकडच्या काळात याची अधिकृत नोंद सापडली नव्हती. मात्र अनपेक्षितपणे हा मासा मनोहरगडाच्या माथ्यावर आढळून आल्यामुळे निसर्ग अभ्यासकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
‘इल’ कुळातील मासे हे इतर माशांपेक्षा वेगळे असतात. स्थानिक भाषेत ‘वाम’ किंवा ‘हैर’ नावाने हे मासे ओळखले जातात. याच कुळातील सापडलेला हा ‘बॉम्बे स्वॅम्प ईल’ मासा हा उभयचर जीवनशैलीतील आहे. हा मासा पाण्यात असताना 80 टक्के श्वसन हे आपल्या कल्ल्यांमार्फत करतो. उर्वरित 15 टक्के श्वसन तो त्वचेमार्फत करू शकतो. परंतु, ज्यावेळी परिस्थिती प्रतिकुल असते म्हणजेच पाण्याचा अभाव वा पाण्याची कमतरता असते, त्यावेळी हा मासा पाण्याच्या एका साठय़ाकडून दुसऱया साठय़ापर्यंत थेट जमिनीवरून सरपटत जातो. जमिनीवर असताना त्याचे त्वचेमार्फत चालणारे श्वसन 15 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत जातं. तो चिखलामध्ये देखील गाढून घेऊन जिवंत राहू शकतो. यावेळी तो चिखलातील ओलाव्याच्या सहाय्याने आपला श्वास सुरू ठेवतो. एक-दोन नव्हे, तर तब्बल आठ ते नऊ वर्षे तो जमिनीखाली जिवंत राहू शकतो. या काळात तो आपल्या शरीरातील चयापचयाची क्रिया बंद करीत असल्यामुळे त्याला अन्नाची आवश्यकता भासत नाही.
या माशाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे हा मासा स्थलांतरप्रिय असतो. गोडय़ा पाण्यातील ‘इल’ प्रजननासाठी समुद्रात स्थलांतर करतात व अंडी दिल्यानंतर ते मरूनही जातात. तर तीव्र उताराच्या नदीतील काही ‘इल’ हे नदीच्या उगमाच्या दिशेने अंडी देण्यासाठी प्रवास करत जातात. आपल्या संपूर्ण जीवन काळात हे मासे फक्त एकदाच अंडी देतात. मनोहर गडावर सापडलेला ‘बॉम्बे स्वॅम्प इल’ याचे वस्तीस्थान गड पायथ्याच्या नदी परिसरात असते. हे मासे अंडी देण्यासाठी नदी प्रवाहातून न जाता घनदाट जंगलातून, उभे कडे पार करीत गडाच्या माथ्यावर पोहोचतात व तेथे अंडी देतात. समुद्र सपाटीपासून दोन हजार फूट उंचावर असलेल्या मनोहर गडाच्या माथ्यावर सापडलेला हा ‘बॉम्बे स्वॅम्प इल’ अंडी देण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचला असवा, असा अंदाज वर्तविला जात आहे.
दरम्यान, या माशाचे अस्तित्व शोधून काढणाऱया पृथ्वीराज बर्डे यांनी याबाबत गडावर येणाऱया दुर्गप्रेमींना आवाहन केले आहे की, ही प्रजात अतिशय दुर्मिळ असून गडावर जाणाऱया दुर्गप्रेमींनी अशा माशांना वा जीवांना कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवू नये अथवा त्यांच्या अधिवासात हस्तक्षेप करू नये.









