गतवर्षीच्या मार्चच्या तुलनेत 0.22 मीटर पाणी पातळी अधिक : मात्र पाणी वापराचे नियोजन आवश्यकच – सागर देसाई
दत्तप्रसाद वालावलकर /ओरोस:
जिल्हय़ात गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. गतवर्षी मार्च महिन्याच्या तुलनेत यावर्षी तब्बल 0.22 मीटर वाढीव पाणीसाठा भूगर्भात उपलब्ध आहे. पाणी पातळी समाधानकारक दिसत असली, तरी नागरिकांनी नियोजन करून पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि पाणीस्त्राsत स्वच्छ ठेवावेत, असे आवाहन जिल्हय़ाचे प्रभारी वरिष्ठ भू वैज्ञानिक सागर देसाई यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे पर्जन्यमान इतर जिल्हय़ांच्या तुलनेत कायमच चांगले राहिले आहे. मात्र जिल्हय़ाच्या काही भागात मे महिन्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. बंधाऱयासारख्या उपाययोजना करूनही यावर मात करणे शक्य होत नाही. काही ठिकाणी तर टँकरनेही पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान भू वैज्ञाानिकांकडून वर्षातून चारवेळा पाणी पातळी मोजली जाते. जिल्हय़ात निरीक्षण नोंदीसाठीच्या जुन्या 42 विहिरी आहेत. सन 1972 पासून दर तीन महिन्यांनी म्हणजेच मार्च, जून, सप्टेंबर, डिसेंबर या महिन्यात या विहिरींमधून पाणी पातळी मोजली जाते. मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या नोंदीनुसार सद्यस्थितीत भूगर्भात 6.16 मीटर इतका पाणीसाठा असल्याचे दिसून आले आहे. गतवर्षी मार्चच्या तुलनेत हा साठा 0.22 मीटरने जास्त आहे. मागील दहा वर्षांचा सरासरी विचार करता तो काहीसा स्थिर असून गतवर्षीच्या तुलनेत मात्र समाधानकारक असल्याचे मत देसाई यांनी व्यक्त केले.
जिल्हय़ाच्या पर्जन्यमानाचा आलेख चांगला आहे. मात्र पाणी नैसर्गिकरित्या उताराच्या दिशेने सतत वाहत असते. पावसाळय़ात भूपृष्ठावरून वाहणारे पाणी आपल्याला सहज दिसते. मात्र पाऊस थांबल्यानंतर नदी प्रवाहातून तसेच जमिनीच्या आतील भागातून ते सतत प्रवाही असते. त्यामुळे पाणी पातळीत घट होताना दिसून येते.
भूगर्भातील दगड काही अंशी पाणी धरून ठेवण्यास मदत करतात. मात्र सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या भूगर्भात जांभ्या दगडाचे प्रमाण अधिक आहे. हा दगड पाणी धरून ठेवण्यास फायदेशीर नाही. त्यामुळे भूगर्भातील पाणी सतत प्रवाही राहते व पाणी पातळी कमी कमी होत जाते. पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत भूगर्भातील पाणी जलद गतीने प्रवाही असते. त्यामुळे या कालावधीत पाणी पातळीत जलद गतीने घट होते. त्यानंतर अंतर्गत प्रवाह थोडे मंदावतात. त्यामुळे पाणी पातळी कमी होण्याचा वेगही मंदावतो. मात्र हळूहळू पातळीत घट ही होतच राहते.
दरम्यान एप्रिल व मे महिन्यात जिल्हय़ात बाहेरून येणाऱया चाकरमान्यांची संख्याही मोठी आहे. साहजिकच पाण्याला मागणीही मोठी राहते व उपसा वाढतो. शिवाय भूगर्भातील अंतर्गत घडामोडीमुळे पाणीटंचाई जाणवू शकते. शिवाय पाऊस लांबल्यास पाणी टंचाईची तीव्रता वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी पुढील दोन महिन्यांसाठी पाण्याच्या वापराबाबतचे नियोजन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
तालुकावार पाणी पातळी
वैभववाडी वगळता सर्व तालुक्यांतील पाणी पातळीत वाढ दिसून आली आहे. दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 0.46 मीटर, तर कणकवली आणि वेंगुर्ले तालुक्यात सर्वात न्यूनतम 0.18 मीटर एवढी नोंदली गेली आहे.
तालुका पाणी पातळी (मीटर) वाढ (मीटर)
दोडामार्ग 5.94 0.46
देवगड 6.07 0.27
मालवण 5.76 0.22
सावंतवाडी 6.79 0.22
कुडाळ 5.58 0.20
वेंगुर्ले 6.15 0.18
कणकवली 7.02 0.18
वैभववाडी 5.95 …….









