19 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीबंद होणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये चुरस असलेल्या सिंदगी आणि हानगल विधानसभा मतदारसंघांमध्ये शनिवारी मतदान होणार असून पोटनिवडणुकीत एकूण 19 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीबंद होणार आहे. दोन्ही मतदारसंघांमध्ये सकाळी 7 पासून सायंकाळी 7 पर्यंत मतदान होणार आहे. मंगळवार दि. 2 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
विजापूर जिल्हय़ाच्या सिंदगी विधानसभा मतदारसंघात एकूण 297 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. तर 1,308 निवडणूक कर्मचारी नेमण्यात आले आहेत. या ठिकाणी एकूण 2,34,584 मतदार आहेत. तर हावेरी जिल्हय़ातील हानगल विधानसभा मतदारसंघात 263 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून 1,155 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एक दिव्यांगस्नेही आणि दोन सखी मतदान केंद्रे असणार आहेत. येथे एकूण 2,04,481 मतदार आहेत. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून विजापूरमधील सैनिक शाळेत हानगल मतदारसंघातील मतमोजणी होईल. आणि हावेरीतील सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात हानगलमधील मतमोजणी होणार आहे.
सिंदगीत भाजपचे रमेश भूसनूर, काँग्रेसचे अशोक मनगुळी, निजदच्या नाझिया अंगडी यांच्यासह 6 उमेदवार रिंगणात आहेत. हानगलमध्ये विधानपरिषदेचे माजी सदस्य शिवराज सज्जनर भाजपमधून, काँग्रेसतर्फे श्रीनिवास माने, निजदतर्फे नियाज शेख यांच्यासह एकूण 13 उमेदवार रिंगणात आहेत.
मतदानाचा हक्क नसणाऱयांना मतदारसंघाबाहेर जाण्याची सूचना देण्यात आल्याने बुधवारी सायंकाळपासून शुक्रवारी सायंकाळपर्यंत उमेदवारांना पाच जणांसह घरोघरी जाऊन प्रचाराची मुभा देण्यात आली होती. मतदानाच्या 72 तास अगोदर जाहीर प्रचार संपुष्टात आल्याने उमेदवारांनी मागील दोन दिवसांपासून घरोघरी जाऊन मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला आहे.
हानगल आणि सिंदगीत भाजप, काँग्रेस आणि निजदला पोटनिवडणूक प्रतिष्ठेची आहे. माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात होत असलेली ही पहिली निवडणूक आहे. दोन्ही मतदारसंघांत आपले उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान सत्ताधारी भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्यासमोर आहे. भाजपच्या तोडीस तोड काँग्रेसनेही प्रचार केला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीप सुर्जेवाला यांच्यासह अनेक दिग्गजांनी प्रचार केला आहे. निजदकडून माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, एच. डी. रेवण्णा यांनी देखील प्रचारात कसर सोडलेली नाही. तिन्ही पक्षातील नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे पोटनिवडणूक प्रचार चर्चेचा विषय ठरला होता. आता शनिवारी मतदान होणार असून कोणत्या पक्षाचे उमेदवार निवडून येतील, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.









