रामदास कदमांच्या प्रयत्नांना यश, राज्यपालांनी शासनाकडे मागितला अहवाल
प्रतिनिधी/ खेड
कोकणातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी 5 हजार कोटी रूपयांचा निधी तत्काळ मंजूर करावा, या माजी पर्यावरणमंत्री व आमदार रामदास कदम यांनी केलेल्या मागणीला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्यपालांनी अप्पर मुख्य सचिव व नियोजन विभाग यांच्याकडे अहवाल मागवला आहे. त्यांच्या स्वाक्षरीचे पत्र रामदास कदम यांनाही प्राप्त झाले आहे.
स्वातंत्र्यानंतर कोकणामध्ये फक्त 1.5 टक्के सिंचन झाले आहे. राज्यात पडत असलेल्या पावसापैकी 40 टक्के पाऊस कोकणात पडत असतो. कोकणात मोठय़ाप्रमाणात पाऊस पडत असतानाही पर्जन्यवृष्टीच्या पाण्याची साठवणूक करण्यासाठी कोकणासाठी निधीच दिला जात नसल्याने हे सर्व पावसाचे पाणी समुद्रात जाऊन मिळते. निधीअभावी बहुतांश प्रकल्प पूर्ण झाली नसल्याने कोकणासाठी 1.5 टक्के इतक्याच सिंचनाची सोय झाली आहे. कोकणाचा सिंचन अनुशेष मोठय़ाप्रमाणात निर्माण झाला आहे.
सिंचनाच्या बाबतीत कोकणावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी 11 ऑगस्ट रोजी राजभवनात राज्यपालांची भेट घेत कोकण विभागाच्या सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी स्वतंत्र 5 हजार कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन दिले होते. कोकण सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी कोकणातील धरणांच्या कामांसाठी निधी मिळत नाही. मात्र कोकणच्या हक्काच्या असलेल्या कोयनेच्या अवजलापैकी फक्त 10 टी.एम.सी. कोकणाला देऊन 57.5 टक्के इतरत्र घेऊन जाण्याचा घाट सुरू आहे.
कोकणावर नाणार प्रकल्प लादू नये, अशी कोकणवासियांची मागणी आहे. मात्र याच नाणार प्रकल्पासाठी 7.5 टी.एम.सी. पाण्याची तरतूद केली आहे. ही बाब कोकणावर अन्याय करणारी असून कोकणाच्या बाहेर 50 टी.एम.सी. पाणी वळवण्याचा जो प्रस्ताव आहे तो रद्द करून फक्त 25 टी.एम.सी. पाणी मुंबईसाठी किंवा रायगडसाठी वळवण्यात यावे. प्रथम रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हय़ांची तहान भागवावी. नंतरच इतरत्र पाणी वळवण्याचा प्रस्ताव आणावा, अशी मागणीही केली होती.
या मागणीच्या अनुषंगाने राज्यपाल कोश्यारी यांनी अप्पर मुख्य सचिव व महाराष्ट्र राज्य नियोजन विभाग यांच्याकडून अहवाल मागवला आहे. माजी पर्यावरणमंत्री कदम यांनी सिंचनाच्या दृष्टीने कोकणावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राज्यपालांकडे केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याने कोकण सुजलाम्-सुफलाम् करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.









