जेतेपदासह राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही मिळविले स्थान
वृत्तसंस्था/ सिंगापूर
भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मिराबाई चानूने सिंगापूर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 55 किलो वजन गटाचे सुवर्णपदक पटकावत यावर्षी होणाऱया राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे.
55 किलो गटात चानूने प्रथमच भाग घेतला होता. तिने एकूण 191 (86 व 105) किलो वजन उचलत सुवर्ण निश्चित केले. दुसरे स्थान मिळविणाऱया ऑस्ट्रेलियाच्या जेसिका सेवास्तेन्कोने 167 (77 व 90) किलो वजन उचलले. मलेशियाच्या एली कॅसान्ड्रा एन्गलबर्टने कांस्यपदक मिळविताना एकूण 165 किलो वजन उचलले. संकेत सागर (55 किलो गट), रिषिकांता सिंग (55 किलो), बिंद्यारानी देवी (59 किलो) या अन्य तीन भारतीयांनीही राष्ट्रकुल स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून चानूने माघार घेतली होती. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकनंतर भाग घेतलेली तिची ही पहिलीच स्पर्धा आहे. ऑलिम्पिकमध्ये तिने रौप्य मिळवित ऐतिहासिक कामगिरी नोंदवली होती. चानू राष्ट्रकुल मानांकनाच्या आधारे 49 किलो वजन गटासाठीही पात्र ठरली आहे. मात्र राष्ट्रकुलमध्ये अधिक सुवर्ण मिळविण्याची संधी मिळावी यासाठी ती 55 किलो वजन गटात खेळणार आहे.
संकेत सागरने 55 किलो गटात क्लीन अँड जर्क तसेच एकूणमध्ये सुवर्ण मिळविताना नवा राष्ट्रकुल व राष्ट्रीय विक्रम नोंदवला. त्याने एकूण 256 (113 व 143) किलो वजन उचलताना आपल्याच देशाच्या रिषिकांताला मागे टाकले. रिषिकांताने 246 (110 व 136) किलो वजन उचलत रौप्य पटकावले. लंकेच्या दिलान्का इसुरू कुमाराने कांस्य मिळविताना एकूण 238 किलो वजन उचलले. राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये रौप्य मिळविलेल्या बिंद्यारानीने भारताला दिवसातील तिसरे सुवर्ण मिळवून दिले. महिलांच्या 59 किलो गटात तिने एकूण 196 (85 व 111) किलो वजन उचलले. ऑस्ट्रेलियाच्या ब्रेना कीनने (190 किलो) रौप्य व टोरी गॅलेगॉसने (183 किलो) कांस्यपदक मिळविले.
सिंगापूर वेटलिफ्टिंग आंतरराष्ट्रीय स्पर्धा ही बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची पात्रता स्पर्धा असून प्रत्येक वजन गटात पहिले स्थान मिळविणारे आठ जण राष्ट्रकुलसाठी थेट पात्र ठरणार आहेत.









