वृत्तसंस्था/ हैदराबाद
सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धा बुधवारी रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. ऑलिम्पिक पात्रता मिळविण्यासाठी ही शेवटची स्पर्धा होती. त्यामुळे भारताचे स्टार खेळाडू सायना नेहवाल व किदाम्बी श्रीकांत यांची ऑलिम्पिक पात्रता मिळविण्याची अखेरची संधीही हुकल्याने ते आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळताना दिसणार नाहीत.
ही स्पर्धा होण्याआधीही सायना, श्रीकांतची संधी अधांतरीच होती. कोरोना महामारीमुळे अनेक स्पर्धा रद्द होऊ लागल्याने त्यांच्या आशेवर पाणी पडत गेले. 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर पहिल्यांदाच सायना नेहवाल ऑलिम्पिकमध्ये खेळताना दिसणार नाही. ‘स्पर्धा संयोजक सिंगापूर बॅडमिंटन संघटना (एसबीए) व विश्व बॅडमिंटन फेडरेशन (बीडब्यूएफ) यांनी संयुक्तपणे ही स्पर्धा रद्द करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. 1 ते 6 जून या कालावधीत ही स्पर्धा होणार होती. स्पर्धेत सहभागी होणाऱया प्रत्येकाला सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी एसबीए व बीडब्ल्यूएफ यांनी हरसंभव प्रयत्न केले. पण कोव्हिड 19 चे रुग्ण प्रचंड प्रमाणात वाढू लागल्याने अंतर्गत प्रवासाचे आयोजन करण्याचे गुंतागुंतीचे आव्हान आयोजकासमोर उभे राहिले. त्यामुळे खेळाडू, स्पर्धेत गुंतलेले कर्मचारी, पदाधिकारी, स्थानिक समुदायाचे आरोग्य आणि सुरक्षा यांचा विचार करून स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला,’ असे बीडब्ल्यूएफने सांगितले.
ही स्पर्धा आता रद्दच करण्यात आल्याने यावर्षी तिचे आयोजन होणार नाही, असे बीडब्ल्यूएफने स्पष्ट केले. ‘टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्याबाबत नवे धोरण जाहीर करण्यात येणार आहे,’ असे बीडब्ल्यूएफने म्हटले आहे. त्यामुळे सायना, श्रीकांत यांना हलकासा आशेचा किरण दिसत आहे. मात्र ऑलिम्पिक स्पर्धा ठरल्याप्रमाणे झाल्यास त्याआधी एखादी स्पर्धा भरविण्यास वेळच मिळणार नाही. त्यामुळे सायना, श्रीकांतसाठी पात्रतेचे दरवाजे व्हर्च्युअली बंद झालेत, असेच म्हणावे लागेल.









