डॉ. मीना वैशंपायन यांचे प्रतिपादन
फोंडा ; साहित्य संशोधन क्षेत्रात ‘पाठ संशोधन’ किंवा ‘पाठ चिकित्सा’ शास्त्राच्या माध्यमातून ग्रंथ इतिहासाला चालना देणारे गोमंतकीय साहित्यिक अनंत काकबा प्रियोळकर हे साहित्य संशोधन क्षेत्रातले युग प्रवर्तक होते. गोवा आणि महाराष्ट्रातला सांस्कृतिक वारसा जपण्याबरोबरच काळाची गरज ओळखून हा वारसा कायमचा टिकेल यासाठी दस्ताऐवज ग्रंथस्वरुपात निर्माण करणारे ते युगपुरुष होते. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूच्या अर्धशतकानंतरही त्यांचे स्मरण साहित्य आणि संशोधन क्षेत्रात आदरपूर्वक केले जाते असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका आणि एशियाटिक संस्थेच्या पदाधिकारी डॉ. मीना वैशंपायन यांनी केले. ‘अ. का. प्रियोळकर आणि संशोधनाचा वारसा’ या विषयावर बोलताना केले. अ. का. प्रियोळकर यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनानिमत्त त्यांच्या कोने प्रियोळ येथील निवासस्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. ‘अ. का. प्रियोळकर आणि संशोधनाचा वारसा’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. r सृजन संवाद गोवा या संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर पत्रकार परेश प्रभू, संस्थेचे अध्यक्ष अनुप प्रियोळकर व संस्थेचे प्रतिनिधी कुमार प्रियोळकर हे उपस्थित होते.
ख्रिस्ती मराठी साहित्याला व्यापक दृष्टीचे अधिष्ठान प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने त्यांनी संशोधनात्मक कार्य केले. ख्रिस्ती मराठी वाङमयाचा सखोल आणि विस्तृत अभ्यास करून अ. का. नी किचकट आणि गुंतागुंतीच्या साहित्याला सुलभ साचा प्राप्त करून दिला. परिणामी हे साहित्य अविनाशी होऊन वाचकांसमोर आणण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न दुर्लक्षित करता येणार नाहीत, असे डॉ. वैशंपायन पुढे म्हणाला. या कार्यक्रमात अ. का. प्रियोळकरांनी लिहिलेल्या चरित्रपर लेख संग्रहाचे अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या दोन खंडांचे प्रकाशन डॉ. मीना वैशंपायन यांच्याहस्ते करण्यात आले. प्रियोळकरांचे उर्वरीत साहित्य भविष्यात पुस्तकरुपाने प्रसिद्ध करण्यासाठी एशियाटीक सोसायटी आणि मराठी संशोधन मंडळ पुढाकार घेणार असल्याची माहिती देण्यात आली. परेश प्रभू म्हणाले, मातृ आणि पितृ कुलामधून जाज्वल्य संस्कार घेऊन अ. का. प्रियोळकर समाजात आणि साहित्याच्या क्षेत्रात वावरले. कोने गावात त्यांच्या नावाचे स्मारक म्हणून ज्या मार्गाला त्यांचे नाव दिले गेले तिथे किमान त्यांच्या नावाची पाटी लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने प्रयत्न करावेत. अनुप प्रियोळकर यांनी स्वागत केले. गोविंद भगत यांनी सूत्रसंचालन तर पांडुरंग नाडकर्णी यांनी आभार मानले.









