आण्णाप्पा पाटील/ बहाद्दरवाडी
मातृभाषा ही ज्ञान आणि संस्कृती यांच्या विकासासाठी प्रेरक असते. सध्या माणसापेक्षा भाषेचे रक्षण करणे गरजेचे बनले आहे. मूल्यहित राजकारणाने संविधानाला तडा जाण्याची वेळ आली आहे. मानवनिर्मित अंधार वाढत चालला आहे, तो सावरण्याची गरज आहे. लेखनकला काळजात असावी लागते. साहित्यिकांनी गोंधळलेल्या मनाला जागे करून सत्य परिस्थितीची जाणिव करून दिली पाहिजे. लेखनाद्वारे समाजाल धरि, आधार, नवीन स्वप्ने दिली पाहिजेत. साहित्यातून नवी दिशा देण्याचे कार्य केले पाहिजे, असे मनोगत संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत पाटणे यांनी बेळगुंदी येथे व्यक्त केले.
बेळगुंदी येथील रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीच्यावतीने रविवारी 17 वे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी संमेलनाध्य या नात्याने बोलत होते. ते पुढे म्हणाले, जे ज्ञान मातृभाषेतून मिळते त्याला सुगंध असतो. समाजाच्या विविध घटकांमध्ये प्रेम, सामंजस्य आणि विश्वास निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी साहित्यिकांनी समाज मनावर मानव धर्म बिंबविण्यासाठी पुढे आले पाहिजे. साहित्य हे काळजाला भिडावे लागते. साहित्य समाजाच्या स्थिती, गतीचे चित्रण करते. साहित्यिकांनी वास्तववादी समाज परिस्थितीचे दर्शन घडवून दिले पाहिजे. मातृभाषा ही आमची अस्मिता आहे. त्याचे रक्षण करण्यासाठी पुढाकार हा सर्व स्तरातून झालाच पाहिजे, असे डॉ. पाटणे म्हणाले.

ग्रंथदिंडीतून मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन
मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली. टाळ-मृदुंगाचा गजर, महापुरुषांच्या वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी, भगवे फेटे, मुलींची वेशभूषा यामुळे ग्रंथदिंडीत ग्रामीण व मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडले.
सकाळी 9 वाजता रवळनाथ मंदिरापासून ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. पुजारी नामदेव गुरव व अरुण गुरव यांच्या हस्ते रवळनाथ मूर्तीचे पूजन करण्यात आले. ग्रा.पं. सदस्य राजू किणयेकर व अॅड. नामदेव मोरे यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करण्यात आले. सदस्य महेश पाटील व नितीन राजगोळकर यांच्या हस्ते पालखी पूजन झाले. शिवनेरी कृषी पत्तीनच्या उपाध्यक्ष रेणुका कंग्राळकर यांच्या हस्ते वीणा पूजन करण्यात आले. निवृत्त सुभेदार, धनंजय मोरे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन करण्यात आले. रवळनाथ गल्ली, चव्हाट गल्ली, गावडे गल्ली, पाटील गल्ली, कलमेश्वर गल्ली, हुतात्मा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे दिंडी संमेलनाच्या ठिकाणी मार्गस्थ होऊ लागली. धर्मवीर संभाजी महाराज मूर्ती पूजन एपीएमसी माजी अध्यक्ष निंगाप्पा मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
हुतात्मा स्मारकाचे पूजन ग्रा.पं. माजी अध्यक्ष शिवाजी बोकडे व मनोहर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन दामोदर मोरे यांनी केले. ग्रंथदिंडीत बेळगुंदी, सोनोली पंचक्रोशीतील नागरिकांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. सांप्रदायिक वारकरी भजनी मंडळांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आदी संतांची भजने सादर केली.
आमदार आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळा व बालवीर विद्यानिकेतन तसेच इतर विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा प्रतिक नाकाडी, गाडगेबाबा यांची वेशभूषा अभिषेक हलकर्णीकर तसेच स्नेहल दळवी, संजना चौगुले, श्रावणी, राजश्री पाटील, भक्ती बाळेकुंद्री, स्वरा पाटील, सृष्टी बेनके, आलीया मुजावर, अक्षता गुरव यांनी परिधान केल्या होत्या.
ग्रंथदिंडी संमेलनाजवळ आल्यानंतर सभामंडपाजवळील रवळनाथ प्रवेशद्वाराचे उद्घाटन सुरेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. साहित्यनगरीचे उद्घाटन विनय कदम, सूरज बेटगेरीकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर आदींच्या हस्ते करण्यात आले. संमेलनाचे उद्घाटन जि. पं. माजी सदस्य मोहन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागताध्यक्ष म्हणून ओम विनीत कॅश्यू इंडस्ट्रीजचे मालक रामचंद्र पाटील होते.
दीपप्रज्वलन बेळगुंदी ग्रा.पं. अध्यक्षा हेमा हदगल, अॅड. सुधीर चव्हाण, प्रतीक गुरव, अडत व्यापारी अशोक गावडा, प्रतिक गुरव आदींच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर मनोज पावशे, मार्कंडेय साखर कारखान्याच्या संचालिका नीलिमा पावशे, ता. पं. माजी सदस्य गीता ढेकोळकर उपस्थित होते. निंगुली चव्हाण, विठ्ठल नाकाडी, सी. आर. पाटील, विलास बेळगावकर, प्रताप सुतार, म्हाळू मजुकर, शिवाजी पाटील आदींच्या हस्ते विविध देवदेवतांचे पूजन करण्यात आले. अकादमीचे अध्यक्ष प्रकाश किणयेकर व भाऊराव काकतीकर यांच्या हस्ते मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
आमदार प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत म्हटले. बालवीर विद्यानिकेतनच्या विद्यार्थिनींनी मराठी पाऊल पडते पुढे हे स्फूर्तीगीत गाऊन उपस्थितांची वाहवा मिळविली. प्रास्ताविक भारत पाटील यांनी केले. मराठी साहित्य समृद्ध व्हावे, मराठी साहित्याचा जागर व्हावा या उद्देशाने बेळगुंदीत 17 वर्षांपासून संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. मराठी ही ज्ञानभाषा आहे, ती टिकविण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न झाले पाहिजेत, असे पाटील यांनी सांगितले.
बेळगुंदी गावाला लोककलेचा वारसा लाभलेला आहे. या संमेलनाने पंचक्रोशीतील युवापिढीला ऊर्जा देण्याचे कार्य केले असून मराठी भाषा व संस्कृती टिकविण्यासाठी संमेलन भरविणे गरजेचे आहे, असे स्वागताध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी सांगितले. समाजाला दिशा देण्याचे कार्य साहित्य संमेलने करतात. साहित्यिकांचे विचार प्रत्येकाने आपल्या आयुष्यात रुजविण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
उद्घाटक मोहन मोरे म्हणाले की, ग्रामीण भागात भाषा आणि संस्कृती जतन करण्यासाठी बेळगुंदी मराठी साहित्य संमेलन कार्य करीत आहे. पुस्तकांच्या माध्यमातून आयुष्याला नवी दिशा मिळते. त्यामुळे ग्रामीण भागात ग्रंथालय उभारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मतभेद विसरून साहित्य संस्कृतीचा जागर करण्यासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले. यावेळी साहित्य सरिता अंकाचे प्रकाशन आर. आय. पाटील व आर. एम. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.
संमेलनातील विशेष सत्कार
पुणे येथील पीएसआय संजय कदम, आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त डॉ. स्नेहल पाटील, आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त भुजंग गावडे, निवृत्त पोस्टमन विलास हुबळीकर, एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळविलेल्या सानिका कुन्नूरकर, नीट परीक्षेत राष्ट्रीय पातळीवर चौथा क्रमांक व राज्यस्तरीय पातळीवर दुसरा क्रमांक मिळवलेल्या रूचा पावशे, राज्यस्तरीय कुस्तीपटू रवळनाथ कणबरकर आदींचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
संमेलनातील ठराव
या संमेलनात दोन ठराव करण्यात आले. 1) सीमाप्रश्न न्यायप्रविष्ठ असल्याने केंद्र शासनाने सीमाभाग केंद्रशासित करावा, अन्यथा सीमावासियांना कार्यालयीन कामकाजासाठी लागणाऱ्या कागदोपत्रांची मराठी भाषेत पूर्तता करण्यास कर्नाटक शासनाला सूचित करून सीमावासियांना न्याय मिळवून द्यावा. या ठरावाचे वाचन भाऊराव काकतीकर यांनी केले. 2) सीमाभागात होणारी साहित्य संमेलने मराठमोळ्या संस्कृतीच्या अविभाज्य अंग आहेत. लोकलढा व लोकवर्गणीतून संपन्न होत असलेल्या साहित्य संमेलनांना महाराष्ट्र शासनाने संमेलनासाठी दोन महिने अगोदर शासकीय अनुदान कमीत कमी 5 लाख रुपये द्यावे. या ठरावाचे वाचन राजश्री कोरडे यांनी केले. दोन्ही ठरावांना उपस्थितांनी टाळ्या वाजवून मंजुरी दिली.
साहित्यातूनच समाजात परिवर्तन
दुसऱ्या सत्रात साहित्य आणि वर्तमान काळ यावर परिसंवाद झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समिक्षक प्रा. वैजनाथ महाजन होते. सांगली येथील प्रा. दि. बा. पाटील, इस्लामपूर येथील डॉ. दीपक स्वामी, मिरज येथील डॉ. भीमराव धुळूबुळू या साहित्यिकांचा सहभाग होता. लिहिण्यासाठी धाडस व तीव्र इच्छाशक्ती असायला हवी. लेखक समाजाला दिशा दाखवून परिवर्तन घडवू शकतात. मुलांना आपण पुस्तके वाचण्यास प्रवृत्त केले पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. त्याचे वाचन आणि आत्मचिंतन झाले पाहिजे, असे वैजनाथ महाजन यांनी सांगितले.
डिजिटल साहित्यावर भर
लेखक सातत्याने वर्तमानावर लिहीत असतो. पुस्तकांतूनच समाज घडत असतो, असे दि. बा. पाटील यांनी सांगितले. मराठी हे असे एकमेव साहित्य आहे जे रोज मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध केले जाते. त्यामुळे मराठी साहित्यिकांनी लोकहित जपले जाईल यासाठीच लेखन करावे. साहित्यिकांचा हा काळ उद्याच्या भविष्याचा मुलाधार होईल यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे डॉ. दीपक स्वामी यांनी सांगितले. काळ बदलत चालला आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीसाठी डिजिटल साहित्य द्यावे लागेल. टीव्हीवरील मालिका, नाटके हेसुद्धा साहित्याचा एक भागच आहे. या मालिकांच्या माध्यमातून साहित्यासंदर्भात जागृती करायला हवी, असे प्रा. भीमराव धुळूबुळू यांनी सांगितले.
नवोदित कवींना प्राधान्य
कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अनिता खेबुडकर होत्या. शहर व परिसरातील नवोदित कवींनी आपल्या कविता सादर केल्या. अर्पिता गाडेकर राकसकोप हिने ‘आधीचा काळ आणि आताचे कलियुग’ ही कविता सादर केली. ‘भीती कुणाची नाही त्याला’ ही कविता भावना दातार यांनी सादर केली. निर्झरा पाटील ‘मोटर लावा’, अस्मिता आळतेकर यांनी ‘कन्यारत्न’, विद्याधर यादव यांनी ‘कधी कधी बायकोसाठी’ या कविता सादर केल्या. संतोष माने व स्नेहल दळवी यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या कविता सादर केल्या. शंकर चौगुले, स्नेहा शहापूरकर, मनीषा नाडगौडा, प्रेमा मेणसे, सविता हुबळीकर, चंद्रशेखर गायकवाड, रोशणी हुंदरे यांनी कविता सादर करून वाहवा मिळविली.









