प्रियांकाच्या पुरस्काराने साताऱयाचा लौकिक उंचावला – आमदार शिवेंद्रराजे भोसले
प्रतिनिधी/ सातारा
राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार तेनजिंग नॉर्गे साहस पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या गिर्यारोहक प्रियांका भोसले हिचे रविवारी साताऱयातील पोवईनाक्यावरील मोठय़ा जल्लोषात स्वागत करण्यात आले. तिच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी सातारकरांनी शिवतीर्थावर गर्दी केली होती. प्रियांकाची ही कामगिरी तरुणांना प्रेरणादायी असून, तिच्या पुरस्काराने जिह्याचा नावलौकिक उंचावला आहे,’ असे गौरवोद्गार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये वर्ष 2021 च्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराचे शनिवारी वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते साताऱयाची गिर्यारोहक प्रियांका मोहिते हिला तेनजिंग नॉर्गे साहस पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रियांकाचे रविवारी सायंकाळी साताऱयातील पोवई नाक्यावर आगमन होताच ढोलताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर प्रियांका मोहिते हिचा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ‘राजधानी सातारा’ या सेल्फी पॉईंटरवर जाहीर सत्कार करण्यात आला. अन्नपूर्णा शिखरावर चढणारी प्रथम भारतीय महिला म्हणून प्रियांका मोहिते हिचा विक्रम नोंद असून यासह अन्य शिखरांवरही त्यांनी चढाई केलेली आहे.
यावेळी प्रियांकाचे वडील मंगेश मोहिते, आई शोभा मोहिते, आजी कल्पना मोहिते, चुलते संदेश मोहिते व तिच्या सर्व कुटुंबियांसह सातारा पालिकेचे पक्षप्रतोद अमोल मोहिते, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निशांत गवळी, इर्शाद बागवान, फिरोज पठाण, रणजित क्रीडा ऍकॅडमीचे रोहन गुजर, निलेश महाडिक, सागर साळुंखे, बबलू सोळंकी, कैलास बागल, मॅरेथॉन संघटनेचे ऍड. कमलेश पिसाळ, माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांच्यासह क्रीडाप्रेमी व सातारकर नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
‘राजधानी सातारा’ या सेल्फी पॉईंटरवर सत्कार
पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर पहिल्यांदाच साताऱयात आलेल्या प्रियांकाचे स्वागत व अभिनंदन करण्यासाठी सातारकर नागरिक, क्रीडाप्रेमींनी शिवतीर्थावर मोठी गर्दी केली होती. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारकरांतर्फे प्रियांकाचा ‘राजधानी सातारा’ या सेल्फी पॉईंटरवर जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजी करत प्रियांकावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
माझ्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा क्षण
सत्काराला उत्तर देताना प्रियांका म्हणाली, ‘आज हा माझ्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे. मी स्वराज्याची चौथी राजधानी असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यापासून गिर्यारोहणाला सुरुवात केली. गेल्या अकरा वर्षांत मी अनेक शिखरे सर केली. हा पुरस्कार माझ्या एकटीचा नसून तो माझ्या कुटुंबाचा, जिह्याचा किंबहुना संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. या पुरस्काराने गिर्यारोहण क्षेत्रात महाराष्ट्राचा ठसा उमटला याचा सार्थ अभिमान वाटतो.








