भाजपची उमेदवारी मिळण्याचा आशावाद, कुठल्याही परिस्थितीत यंदाची निवडणूक लढविणारच, आम्ही दिशाभूल करणारे राजकारण करत नाही : कवळेकर
प्रतिनिधी /सांगे
जाहीर सभेला लाभलेली उपस्थिती पाहता भाजपची उमेदवारी मलाच मिळणार, असा आशावाद भाजपच्या राज्य महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा सावित्री कवळेकर यांनी सांगे बसस्थानकावर आयोजित जाहीर सभेत बोलताना व्यक्त केला. कवळेकर यांच्या समर्थकांनी रविवारी सांगे बसस्थानकावर जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेला सुमारे पाच हजार लोकांची हजेरी होती. गेली पाच वर्षे सांगेतील जनतेची आपण जी सेवा केली आहे त्याची पोचपावती या निवडणुकीत जनता आपल्याला देणार असल्याचे कवळेकर म्हणाल्rप्.
आम्ही सरळ राजकारण करत आलो आहोत. त्यामुळे केपेतून चार वेळा बाबू कवळेकर निवडून आले आहेत. आम्ही खोटारडे व दिशाभूल करणारे राजकारण करत नाही. एक महिला बहीण, आई अशी भूमिका उत्तम बजावू शकते. महिलाच राजकारण शुद्ध करू शकतात. एक वेळ आपल्याला संधी द्यावी, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. गणेश श्लोकाने सावित्री यांनी आपले भाषण सुरू केले. पक्षाचे चिन्ह नसताना आज लाभलेली उपस्थिती पाहता जनतेचा विश्वास व प्रेम यांच्या जोरावर ही विधानसभा निवडणूक आम्ही जिंकणार, असे त्यांनी सांगितले. माजी आमदार जर स्वतःला इतके हुशार समजतात, तर 2017 च्या निवडणुकीत त्यांना पराभव का पत्करावा लागला, असा सवाल कवळेकर यांनी केला. आपण 2022 ची विधानसभा निवडणूक लढवणार म्हणजे लढवणार, असे स्पष्ट निवेदन त्यांनी केले.
संधी दिली, तर सोने करू
या मतदारसंघाच्या समस्या, प्रश्न यांची पुरेपूर जाणीव आपल्याला असून मतदारांनी संधी दिली, तर त्याचे सोने करू. जो माणूस आपल्याच कार्यकर्त्यांची बदनामी करतो तो टिकू शकत नाही, असे कवळेकर पुढे म्हणाल्या. या सभेत सर्वच वक्त्यांनी सावित्री कवळेकर याच सांगेसाठी योग्य पर्याय असल्याचे सांगितले. कवळेकर समर्थकांनी यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन घडवून आणले. सांगे बसस्थानक खचाखच भरला होता. त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
रोखण्याचा प्रयत्न केला, तरी विजय निश्चित
या सभेत कवळेकर यांनी निवडणूक लढविण्याचा दृढनिश्चय व्यक्त करताना कोणीही रोखण्याचा प्रयत्न केला, तरी असंख्य कार्यकर्त्यांचा बळावर आपला विजय नक्कीच होईल आणि तमाम महिला त्यांच्या प्रतिनिधी म्हणून आपल्याला एक संधी देतील, असा आशावाद व्यक्त केला. ही सभा होऊ नये म्हणून जितका प्रयत्न केला गेला त्याच्या विरोधात सांगेतील जनतेने जो अफाट प्रतिसाद दिला त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करते, असे त्या म्हणाल्या.
आता कोणत्याही स्थितीत माघार नाही
अजूनही मी भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षा असून नवनाथ नाईक सांगेत विखुरलेल्या भाजप कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचे काम करतात ही त्यांची चूक आहे काय. पण पक्षाला वेठीस धरून, पत्रकारांना हाताशी धरून त्यांना काढून टाकल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. सांगेत आपणच हुशार म्हणून सांगणाऱयाला दुसऱयांदा घरी का जावे लागले हे त्यांनी आधी स्पष्ट करावे. सावित्री कवळेकर बाहेरच्या आहेत की नाहीत हे हजारो कार्यकर्त्यांनी आज सिद्ध करून दाखविले आहे. अशा असंख्य कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुर्च्या सुद्धा अपुऱया पडल्या त्याबद्दल आपण त्यांची क्षमा मागते. आता कोणत्याही परिस्थितीत माघार न घेता सांगेतील मतदारांच्या जोरावर आपण निवडणूक जिंकणार, असे कवळेकर यांनी सांगितले.
सांगेत एक हिरण्यकश्यपू : नाईक
माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष नवनाथ नाईक म्हणाले की, सांगेत एक हिरण्यकश्यपू आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना संपविण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी आम्ही सांगेच्या मातीतून वर आलेलो आहोत याचा विसर पडू देऊ नये. एक तर आम्ही संपू किंवा हिरण्यकश्यपूला संपवून जाऊ, असा इशारा त्यांनी जाहीर सभेतून दिला. आपल्याला सांगे भाजप अध्यक्षपदावरून काढण्यासाठी काही पत्रकारांना हाताशी धरून खुलासा करण्यात आला आहे. प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांना सांगू द्या की, नवनाथ नाईक यांना काढून टाकले, तेव्हाच आपण ते खरे मानू, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले. खरा विकास तेव्हाच होतो जेव्हा शेवटच्या माणसाचा विकास होतो. पण अजूनही तो झालेला नाही, अशी खंत व्यक्त करून सांगेत भाजपाची उमेदवारी सावित्री कवळेकर यांनाच मिळणार, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर कावरेपिर्ला सरपंच समीक्षा गावकर, नगरसेवक मेशू डिकॉस्ता, सदानंद गावडे, आनंद नाईक, चंदन उनंदकर, माजी नगराध्यक्षा चांगुणा साळगावकर, नानू भांडोळकर, उदय गावकर, संतोष गावकर, जानू ताटे, जानू जोरे, पांडुरंग तारी, हर्षा सांबारी, सगुण गावकर, कांता कालेकर, महेश गावकर, चंद्रकांत गावकर, कुष्ट गावकर, मनोज पर्येकर आदी अनेक ज्ये÷ कार्यकर्ते, माजी सरपंच-पंच उपस्थित होते.
सांगेतील जनता यापुढे फसणार नाही
नगरसेवक डिकॉस्ता म्हणाले की, आपले वय झाले नव्हते त्या वेळेपासून आपण प्रचारकार्यात सहभागी होत आलेलो असताना सुभाष फळदेसाईंना आताच आपण पोर असल्याचा साक्षात्कार झाला काय. सांगेतील जनता स्वाभिमानी असून यापुढे कोणत्याही परिस्थितीत फसणार नाही. भाजपाची उमेदवारी सावित्री कवळेकर यांनाच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी अनेक वक्त्यांनी माजी आमदारावर तोंडखुख घेतले. त्याचबरोबर भाजपची उमेदवारी सावित्रा यांनाच मिळेल, अशी आशा व्यक्त केली. चंदन उनंदकर, महेश गावकर, संतोष गावकर, नानू बांडोळकर, मनोज पर्येकर, सदानंद गावडे यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन प्रशांत गावकर यांनी केले, तर आभार सुदेश भंडारी यांनी मानले.
सावित्री कवळेकर यांनी गेल्या पाच वर्षांत आपला पराभव होऊन सुद्धा सांगे मतदारसंघात सातत्याने विविध क्षेत्रांत केलेल्या कार्याच्या जोरावर या जाहीर सभेतून जोरदार शक्तिप्रदर्शन घडविले आणि त्यांच्या पाठीशी असलेले जनसमर्थन आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना नक्कीच विजयी करेल, असा आत्मविश्वास समर्थकांना मिळवून दिला. सावित्री या बाहेरच्या आहेत असा प्रचार विरोधक करत असताना सांगेतील मतदारांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांच्या विरोधकांना सणसणीत उत्तर दिले आहे, अशा प्रतिक्रिया सभेनंतर कवळेकर यांच्या समर्थकांनी व्यक्त केल्या.









