सभापती पदाची कोणाला संधी मिळणार? : पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने साविआचा असणार नवीन प्रयोग : खासदार उदयनराजेच देणार साविआतल्या नगरसेवकांना एकीचा कानमंत्र
प्रतिनिधी / सातारा
सातारा विकास आघाडीच्या विषय समितीच्या सभापती पदाच्या मुदती संपल्या आहेत. नव्याने निवडी दि. 11 रोजी होत आहेत. या निवडीमध्ये सातारा विकास आघाडीमध्ये ज्यांना आजपर्यत संधी मिळाली नव्हती अशा नव्या चेहऱयांना सातारा विकास आघाडी संधी देणार आहे. मग हे नवे चेहरे कोण?, जुन्या चेहऱयांना परत रिपीट करणार नाहीत अशी खात्रीपूर्वक माहिती साविआच्या गोटातून मिळाली आहे. दरम्यान, पुढच्या वर्षी येवू घातलेल्या पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा विकास आघाडीमध्ये नवीन प्रयोग होत आहे. खासदार उदयनराजे हे स्वतः साविआतील नगरसेवकांना एकीचा कानमंत्र देणार आहेत.
सातारा पालिकेतील साविआच्या सत्तेला चार वर्ष पूर्ण झाली असून विषय समितीच्या सभापतीपदाचा कालावधी दि. 3 रोजी संपला आहे. सत्तेवर आल्यानंतर पहिल्या वर्षी विषय समितीच्या निवडीमध्ये खासदार उदयनराजे यांनी महत्वाच्या शिलेदारांना संधी दिली. त्यामध्ये अनेकजण जवळचे शिलेदार समजले जात होते. त्यात पाणी पुरवठा म्हणून श्रीकांत आंबेकर असतील, बांधकाम म्हणून मनोज शेंडे असतील, आरोग्यमध्ये अण्णा लेवे असतील. महिला व बाल कल्याण व समाजकल्याण सभापतींमध्ये सीता हादगे, संगीता आवळे यांना संधी गेली. त्यांचे कामही चांगले होते. लेवे यांच्यानंतर यशोधन नारकर यांच्याकडे आरोग्याची जबाबदारी दिली गेली. पुन्हा नारकर यांना पाणी पुरवठय़ाची जबाबदारी सोपवली गेली होती. किशोर शिंदे यांच्याकडे एक वर्षी बांधकाम सभापतीपदाची जबाबदारी होती. स्थायीच्या सदस्यपदीही साविआतून स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक या दोघींना संधी दिली गेली. तसेच यापूर्वी या दोघींनीही मोठय़ा पदावर म्हणजे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष म्हणून पदभार कारभार पाहिला आहे.
आता साविआत नवीन चेहऱयांना संधी देण्यात येणार अशी खात्रीशीर माहिती आहे. त्यामुळे नवीन चेहरे नेमके साविआत कोण आहेत. जे येवू घातलेल्या पालिका निवडणुकीमध्ये सातारकरांचे समाधान करण्यासाठी ऍक्टीव्ह म्हणून खासदार उदयनराजेंचे नाव उज्वल करतील असे नगरसेवक कोण?, याचीच सातारा विकास आघाडीत ट्विस्ट निर्माण झाले आहे. दरम्यान, एकाही जुन्या पदाधिकाऱयांना संधी दिली जाणार नाही, अशी चर्चा असल्याने जुन्या पदाधिकाऱयांच्या आशा आता मावळ्ल्या आहेत. नवीन चेहऱयांची नावे अद्यापही कुठे जाहीर झाले नाहीत. मात्र, येत्या दोन दिवसात ही नावे निश्चित कळतील, असे समजते. येवू घातलेल्या निवडणुकीत सातारा विकास आघाडीमध्ये जे गटतट आहेत ते दूर करण्यासाठी दस्तुरखुद्द खासदार उदयनराजे हेच एकीचा कानमंत्र या निवडीपूर्वी देणार आहेत, अशीही माहिती सातारा विकास आघाडीतल्या खात्रीशीर वृत्तांनी दिली.
बांधकाम सभापती काकडे यांनी टाकला सुटकेचा निश्वास
खासदार उदयनराजे समर्थक असलेले भाजपाचे नगरसेवक मिलिंद काकडे यांच्यावर बांधकाम सभापती म्हणून खासदार उदयनराजे यांनी जबाबदारी दिली होती. ती जबाबदारी त्यांनी उत्कृष्टपणे पेलली. त्यांची मुदत संपल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला अन् आपल्या कार्यकाळात केलेल्या कामांचा आढावा घेण्याकरिता ते दररोज पालिकेत येतात. आता प्रभागातल्या कामामध्ये त्यांनी लक्ष घातले आहे.









