राष्ट्रीय विकास सेनाच्यावतीने महावितरण कारवाईचा निषेध
सावळज / वार्ताहर
कोरोना संकट काळातील वीज बिलात सवलत द्यावी तसेच थकित वीज बिलाचे हप्ते पाडून देण्याची मागणी करीत सावळज महावितरणच्या थकीत वीज बिल कनेक्शन कट करण्याच्या कारवाईचा निषेध करीत राष्ट्रीय विकास सेनाच्यावतीने सावळज येथील महावितरण कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
कोरोना काळातील वीज बिलात सवलत देण्याची मागणी होत असताना महावितरणने थकीत वीज बिल कनेक्शन तडकाफडकी कट करण्याची कारवाई जोमाने सुरू केल्याने ग्राहकांच्यातुन संताप व्यक्त करण्यात येत आहे. अडचणीच्या काळी शासनाने वीज बिलात सवलत द्यावी तसेच वीजबिलाचे हप्ते पाडून देण्याची गरज असताना सावळज महावितरणच्यावतीने शासनाच्या आदेशाचे पालन करून कोणतीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी ग्राहकांचे वीज कनेक्शन कट करण्याची कारवाई सुरू केली आहे.
या कारवाईविरोधात राष्ट्रीय विकास सेनेच्यावतीने अर्धनग्न मोर्चा आंदोलन करून या कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे तसेच महावितरणने कोरोना काळातील थकित वीज बिलाची सक्तीने वसुली न करता पूर्वसूचना व नोटीस देऊन कारवाई करावी. तसेच महावितरण अधिकारी यांनी तडकाफडकी अन्यायकारक वसुली थांबवुन वीज बिलात सवलत द्यावी अशी मागणी केली आहे. अन्यथा कायदा हातात घेऊ असा इशारा राष्ट्रीय विकास सेनाचे प्रशांत सदामते यांनी दिला आहे. यावेळी राष्ट्रीय विकास सेनेचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.