बागायतींबरोबर स्थानिकांच्या घरांत पाणी शिरले, स्थानिक युवावर्गाकडून मदतकार्य
प्रतिनिधी / कुडचडे
राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा परिणाम उर्वरित राज्याबरोबर सावर्डे मतदारसंघात शुक्रवारी सकाळी दिसून आला. कुडचडे-सावर्डेला जोडणाऱया जुवारी नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे येथील बागायतींबरोबर स्थानिक ग्रामस्थ रूतेश नाईक, बाबय नाईक यांच्या घरांत पाणी घुसून बरेच नुकसान झाले.
सदर नदीच्या काठी बरीच घरे असून ती बऱयाच वर्षांपासून आहेत. कितीही पाऊस पडला, तरी येथे सहसा अशी स्थिती निर्माण होत नाही. पण यंदा पावसाचा जोर वाढला असून साळावली धरण जलाशयही भरलेला आहे. धरणाचे पाणी व पावसाचे पाणी एकत्र झाल्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे व त्याचा परिणाम येथे दिसून आलेला आहे. त्यात नवीन रेल्वे पूल बांधण्यात येत असून सदर काम करण्यासाठी नदीत टाकलेला मातीचा भराव आहे त्याच स्थितीत आहे. त्यामुळे नदीचे वाढलेले पाणी जाण्यात अडथळा निर्माण होताना दिसू लागला आहे, असा दावा करताना सावर्डे काँग्रेस गट अध्यक्ष श्याम भंडारी यांनी या अडचणीवर ताबडतोब मामलेदारांनी उपाययोजना करावी, अशी मागणी घटनास्थळी बोलताना केली.
येथील युवा गटांनी कोणतीच भीती न बाळगता पाण्याने भरलेल्या घरांतील आवश्यक वस्तू दुसऱया ठिकाणी स्थलांतरित करण्याकामी पुढाकार घेतला. तसेच कुडचडेचे निरीक्षक रवींद्र देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याला सहकार्य केले, असे सांगून त्याबद्दल भंडारी यांनी त्यांचे आभार मानले. पाण्याची जी पातळी वाढलेली आहे ती पावसाचा जोर वाढल्यामुळे झालेली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे धडे-सावर्डे येथील लोकांत खळबळ माजली व त्याच क्षणापासून येथील सर्व युवकांनी येथील पाणी भरलेल्या घरांतील सदस्यांना मदत करण्याचे कार्य सुरू केले. अशा या स्थितीत ज्यांना नुकसान झाले आहे त्यांना भरपाई देण्यासाठी सरकारने तत्परतेने पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक राजदीप नाईक यांनी केली.
भरपाईसाठी पावले उचलणार ः पाऊसकर
धडे, सावर्डे येथे जुवारी नदीतील पाण्याची पातळी वाढल्यामुळे जी आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे त्याबद्दल दुःख होत आहे. ज्यांना या स्थितीचा फटका बसला आहे त्यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने सरपंच या नात्याने पावले उचलणार आहे. या घटनेबद्दल मामलेदार व उपजिल्हाधिकाऱयांना सूचित करण्यात आले आहे, अशी माहिती सावर्डेचे सरपंच संदीप पाऊसकर यांनी घटनास्थळी दिली. यावेळी त्यांच्यासोबत युवावर्ग तसेच सुनील नाईक उपस्थित होते.









