येळ्ळूर येथील निवृत्त शिक्षिकेचे 12 तोळय़ांचे दागिने हातोहात लुटले
प्रतिनिधी /बेळगाव
बाजारपेठेत, बसस्थानकावर व इतर गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या बॅगमधील दागिने पळविण्याच्या घटना वाढल्या आहेत. या चोऱयांमागे महिला गुन्हेगारच सक्रिय असल्याची माहिती मिळाली असून चार दिवसांत घडलेल्या दोन घटनांमुळे एकच खळबळ माजली आहे. गर्दीच्या ठिकाणी जाताना महिलांनी सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
येळ्ळूर (ता. बेळगाव) येथील एका निवृत्त शिक्षिकेच्या बॅगमधील 12 तोळय़ांचे दागिने हातोहात पळविण्यात आले आहेत. मंगळवार दि. 24 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 ते 4 यावेळेत ही घटना घडली असून सरदार्स हायस्कूल मैदानापासून ऑटोरिक्षातून प्रवास करताना हा प्रकार घडला आहे. खडेबाजार पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
येळ्ळूर येथील निवृत्त शिक्षिका सुमन गोपाळराव कंग्राळकर (वय 62) या मंगळवारी आपल्या पतीसह जाधवनगर येथे वैद्यकीय उपचारासाठी गेल्या होत्या. स्पर्श क्लिनिकमध्ये उपचार घेऊन गावी जाण्यासाठी सुमन व गोपाळराव या वृद्ध दाम्पत्याने सरदार्स हायस्कूल मैदानाजवळ ऑटोरिक्षा केली. ही रिक्षा पवन हॉटेलजवळ आल्यानंतर त्या ठिकाणी तीन महिला चढल्या.
पवन हॉटेलजवळ रिक्षात बसलेल्या महिला संचयनी सर्कलजवळ उतरल्या. पुढे सुमन व गोपाळराव या रिक्षातून गेले. 4 वाजता हे दाम्पत्य घरी पोहोचले. त्यावेळी सुमन यांच्या व्हॅनिटी बॅगमधील 60 गॅमचे मंगळसूत्र व 60 ग्रॅमची मोहनमाळ असे 12 तोळय़ांचे दागिने चोरीस गेल्याचे आढळून आले. या दाम्पत्याने तातडीने पुन्हा बेळगाव गाठले. रात्री खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद देण्यात आली.
पवन हॉटेलजवळ रिक्षात चढलेल्या तीन महिलांनी संचयनी सर्कलपर्यंतच्या प्रवासात सुमन यांच्या व्हॅनिटी बॅगमधील दागिने पळविल्याचे उघडकीस आले आहे. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर पुढील तपास करीत आहेत. बेळगाव शहर व उपनगरांत महिलांच्या बॅगमधील दागिने पळविण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा बहुतेक घटनांमागे महिला गुन्हेगार कार्यरत असल्याची माहिती सामोरी आली आहे.
चार दिवसांतील दुसरी घटना
केवळ चार दिवसांत अशा प्रकारच्या दोन घटना घडल्या आहेत. शुक्रवार दि. 20 ऑगस्ट रोजी ताशिलदार गल्ली येथील यशोदा निखिल चौगुले या सायंकाळी बाजारात आल्या होत्या. नातेवाईकांची वास्तुशांती आटोपून त्या थेट बाजारात गेल्या होत्या. त्यावेळी गळय़ातील साडेतीन तोळय़ाचे गंठण पर्समध्ये ठेवून ते आपल्या बॅगमध्ये ठेवले होते. बाजार घेऊन घरी परतेपर्यंत दागिने असलेली पर्स अज्ञातांनी पळविल्याचे उघडकीस आले होते. या घटनेचीही खडेबाजार पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.
महिलाच लक्ष्य
सध्या श्रावण महिना सुरू आहे. सणासुदीनिमित्त महिला देवदर्शनासाठी बाहेर पडतात. धार्मिक कार्यक्रम किंवा देवदर्शनासाठी बाहेर पडणाऱया महिलांच्या अंगावरील दागिने पळविण्यात येत आहेत. यामागे महिला गुन्हेगारांची टोळी सक्रिय असून पोलिसांनी दागिने पळविणाऱया महिलांना अटक करावी, अशी मागणी होत आहे. बस, ऑटोरिक्षात प्रवास करणाऱया महिलांना गर्दीत धक्काबुक्की करीत त्यांच्या अंगावरील किंवा व्हॅनिटी बॅगमधील दागिने पळविण्यात येत आहेत.









