अनेक तलावे सुकण्याच्या मार्गावर : उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने पाणी पातळी खालावतेय
प्रतिनिधी / बेळगाव
मागील दोन वर्षांपासून जोरदार पावसाने हजेरी लावून अनेकांना सुखद धक्का दिला आहे. 2018 मध्ये तर मोठय़ा प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे तलावे, विहिरी तुडुंब भरल्या होत्या. आता मागील वषीही अशीच अवस्था झाली होती. मात्र आता उन्हाच्या झळा तीव्र होत असल्याने विहिरी आणि तलावेही सुकू लागली आहेत. त्यामुळे पाण्याचे नियोजन करण्याची गरज व्यक्त होत आहे.
अनेक गावांमध्ये सध्या विविध योजनांमधून तलावांच्या खोदाईचे काम हाती घेण्यात आले आहे. याला चांगला प्रतिसाद मिळू लागला असून नागरिकांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. मात्र इतके काम होवूनही तलावात पाणी साठण्याचे प्रकार कमी झाले आहेत. जमिनीची पोत वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ही क्ल्युप्ती लढविली असली तरी ती प्रभावीपणे राबविण्यास यश येत नसल्याचेच दिसून येत आहे. आता तलावांच्या सभोवती वृक्षलागवड करण्याचा मानस तालुका पंचायतीने सुरू केला आहे. मात्र एप्रिलच्या सुरूवातीलाच तलावातील पाणी कमी होत चालल्याने शेतकऱयांना चिंता लागून राहिली आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील अनेक गावांमध्ये रोजगार हमी योजना व आमदार फंडातून तलाव खोदाईचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना रोजगारही मिळत आहे. हे काम मागील दोन वर्षांपासून सुरू असले तरी काही वर्षापासून याला मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सध्या जमिनीतील पाणी पातळीत मोठय़ा प्रमाणात घट झाली असून पाणी पातळी वाढविण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत.
उद्योग खात्री योजनेतून 5 ते 6 फुटांपर्यंत तलावांची खोदाई करण्यात येते तर काही ठिकाणी जेसीबीने खोदाई केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काही तलावांमध्ये पाणी, गाळ व जलपर्णी वाढल्यामुळे खोदाई करणे गरजेचे होते. मात्र तलावांमध्ये पाणी असल्या कारणाने खोदाई करताना अडचणी निर्माण होत होत्या. आता पाणी नसल्याने सर्वच गावांमधील तलावांचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातूनही समाधान व्यक्त करण्यात येत असले तरी पाणी पातळीत वाढ होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
गावांमध्ये असणारे तलाव शेतकरी व नागरिकांसाठी अतिशय लाभदायक ठरतात. पावसाळ्यामध्ये तलाव तुडुंब भरले की, शेतकऱयांना पिकांना पाणी देण्यासाठी व जनावरांना पाणी पाजण्यासाठी या तलावांचा चांगला उपयोग होतो. बेळगाव तालुक्मयातील सर्रास तलावांमध्ये यावर्षी कमी पाण्याचा साठा झाला होता. त्यामुळे पावसानंतर महिना दोन महिन्यातच ते पाणी खाली झाले होते. त्यामुळे नागरिक व शेतकऱयांना कोरडय़ा पडलेल्या तलावांऐवजी दुरवरुन पाणी आणून पिकांना व जनावरांना पाणी पाजावे लागत आहे. सध्या शेतकऱयाला वळिवाची ओढ लागली असली तरी यंदा चांगला पाऊस पडल्यास शेतकऱयांना त्याचा फायदा होणार आहे.









