गेली दोन वर्षे संपूर्ण जगात हैदोस माजविणारा व भारतात हाहाकार माजविणारा कोविड पुन्हा एकदा नव्याने फैलावण्यास प्रारंभ झालेला आहे. संपूर्ण देशभरात शुक्रवारी नव्याने सुमारे बारा हजार बाधितांची नोंद झाली. सुमारे 28 जणांनी प्राण गमविला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरातील जनतेला सावधानतेचा इशारा दिलेला आहे. आपण या दिवसांमध्ये अनेक सण, उत्सव साजरे करीत आहोत आणि जाईल तिथे नागरिकांची गर्दी उसळत आहे. जगात भारत हा लोकसंख्येत पहिला देश ठरलेला आहे. भारताने चीनला देखील लोकसंख्येच्याबाबतीत मागे टाकलेले आहे. त्यामुळे साहजिकच जाईल तिथे माणसांची गर्दी उसळते आहे. कोविड ऊर्फ कोरोना हा तसा एकमेकांच्या संपर्कातून सर्वत्र पसरणारा असा विषाणू आहे. गेल्या दोन वर्षांत या विषाणूने भारतात हाहाकार माजविला. लाखो नागरिकांचे या विषाणूने बळी घेतलेले आहेत. कोविडच्या या अतिभयानक संक्रमणातून देश हळूहळू बाहेर पडून आपली अर्थव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न करीत आहेच शिवाय आर्थिक कोष्टक स्थिरस्थावर आणण्याचा प्रयत्न करीत असतानाच कोविडने पुन्हा एकदा डोके वर काढलेले आहे. देशात सध्या 66 हजारांपेक्षाही जास्त प्रमाणात कोविडचे बाधित सापडलेले आहेत, ही तशी गंभीर बाब आहे. दैनंदिन बाधितांची संख्या दहा हजारांपेक्षा जास्त वाढत आहे. याचा अर्थ कोविड पुन्हा एकदा फैलावण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासून देशभरातील जनतेने सावधानता बाळगली पाहिजे. कालच एका नव्या बातमीने अनेकांची छाती धडधडावयाला भाग पाडले. नवा एक विषाणू उंबरठ्यावर येऊन पोहोचलेला आहे. तो जणू काही कोविडचाच बाप. या देशाने आतापर्यंत अनेक संकटांना समर्थपणे तोंड दिलेले आहे. आता देखील येणाऱ्या नव्या संकटाची चाहूल आपल्याला लागलेली असून या नव्या विषाणूशी व कोविडच्या नव्या आवृत्ती विरोधात लढण्यासाठी आपल्याला नव्याने सज्ज राहावे लागेल. कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. तिथे सर्वच पक्षाचे नेते आपापल्या सभेत शक्तीप्रदर्शन घडवित आहेत. शक्तीप्रदर्शन आज ना उद्या कधीही घडविता येते परंतु शक्तीप्रदर्शनाकरीता माणसे गोळा करायची, नियम भंग करायचा आणि नंतर त्यातून कोविड फैलावण्याचीही शक्यता असल्याने कोविड फैलावला तर त्यास जबाबदार कोण? निवडणूक आयोगाने आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात काही बंधने घालून कोविड प्रतिबंधक उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे. देशातील बहुतेक जणांनी कोविड विरोधात प्रत्येकी दोन इंजेक्शन तथा डोस घेतलेला आहे. डोस घेतलेला आहे म्हणजे आपल्याला पुन्हा कोविड होणार नाही, असा गैरसमज करून घेता कामा नये. डोस न घेतलेले गेले तसेच डोस घेतलेले देखील कोविडमुळे गेलेले आहेत. देशात कुठे ना कुठेतरी सण-उत्सव चालूच आहेत व यानिमित्त होणारी प्रचंड गर्दी आवरणे सध्या आवश्यक बनलेले आहे. सुरुवातीच्या काळात म्हणजेच इ.स. 2020 मध्ये जशी कोविडची सर्वांनीच भिती बाळगली तशाच पद्धतीची थोडीतरी भिती असावी अन्यथा बिनधास्तपणे वागल्यास आपण सर्वचजण नव्याने कोविड वाढीला प्रोत्साहन देऊन बसणार. शुक्रवारी एका दिवसांत अकरा हजार पेक्षाही जास्त जण कोविडमुळे बाधित होणे, ही गंभीर बाब आहे व त्यातील गांभिर्य सर्वांनीच ओळखून आपापल्या आरोग्याची काळजी घेतली तर कोणालाही कोविडची बाधा होणार नाही. कोविड संसर्गामुळे 28 बाधितांना मरण येणे म्हणजेच कोविडने आपण अद्याप गेलेलो नाही, असे सूचित केलेले आहे. शुक्रवारी एका दिवशी 66 हजार पेक्षाही जास्त बाधितांवर औषधोपचार चालू आहेत. भारत सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात कोविड बाधित बरे होण्याचे प्रमाण 98.67 टक्के एवढे आहे. म्हणजे हा आकडा समाधानकारक आहे परंतु कोविड पूर्णत: या देशातून हटलेला नाही. त्यातच अलीकडच्या दिवसांमध्ये कोविडचे वाढते प्रमाण हे पुन्हा एकदा चिंता निर्माण करण्याचे कारण ठरत आहे. कोविडच्या वाढीसाठी केवळ सरकारच जबाबदार आहे अशातला भाग नाही तर आपण नागरिकांनी देखील कोविड गेला म्हणून पुन्हा जो नियमभंगांचा उच्छाद मांडलेला आहे, तो वेळीच बंद केला पाहिजे. तोंडावरची मुखपट्टी हटविण्यापासून अनेक नियमांचा भंग आपण स्वत: करीत आहोत. गेल्या तीन ते चार महिन्यांमध्ये सर्दी, पडसे, खोकला व कफ यामुळे जे नागरिक हैराण झाले, त्यात डॉक्टर देखील हैराण झाले कारण थंडी-पडशावर कोणतीही औषधे लागू पडायला तयार नाहीत. अर्थात ही सर्दी-पडसे साधी सहज पद्धतीची नाहीत तर ती गंभीर स्वरुपाची आहेत व तो तर मिनी कोविडच असल्यासारखे मत अनेक आरोग्यतज्ञांनी व्यक्त केलेले आहे. देशातून कोविडचे उच्चाटन झालेले नाही, याची जाणीव आपल्याला पुन्हा होऊ लागली आहे आणि देशभरात कोविडने आपले जाळे पसरविलेले आहे. त्यामुळेच तर आतापासून योग्य ती उपाययोजना आणि खबरदारी प्रत्येक नागरिकांनी उचलली पाहिजे आणि देशातील नागरी आरोग्य व्यवस्था पुन्हा एकदा सज्ज होणे आवश्यक आहे. बाधितांची संख्या जेव्हा वाढते, त्यावेळी ती दुप्पटीने वाढते, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कोविडला साधा आजार समजू नये, हे आपण पाहिलेले आहे व जाणलेले आहे. सध्याच्या बदलत्या वातावरणात कोविड बरोबरच नव्या पद्धतीचे विषाणू भारतात देखील प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, याची जाणीव असणे आवश्यक आहे. सध्यातरी देशात दैनंदिन संसर्गाचे प्रमाण 5.46 टक्के एवढे आहे. देशाने आतापर्यंत 220 कोटी लसींचे डोस नागरिकांना दिलेले आहेत. काहींनी दोन तर काहींनी तीन डोस घेतलेले आहेत. म्हणून सध्यातरी परिस्थिती थोडी नियंत्रणात आहे. मात्र कोविड संपुष्टात आलेला नाही. तो पुन्हा एकदा नव्याने डोके वर काढीत आहे. त्यामुळे आतापासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तोंडावर मुखपट्टी बांधणे, जादा गर्दी करून न राहणे इत्यादी उपाययोजना आखणे आवश्यक आहे. देशातील सर्वच राज्यांनी आपली राजकीय उपरणी बाजूला फेकून नव्याने येणाऱ्या या संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








