कोविड-19 या अभूतपूर्व विकाराने ग्रासलेले 2020 साल आठवडाभरात संपेल. जागतिक आरोग्य संघटनेने 9 जानेवारी 2020 रोजी कोविड-19 ची घोषणा केली. पाठोपाठ कल्पनातीत वेगाने हा विकार जगभर पसरला. जगातील 7 लाख 51 हजार व्यक्तींचा त्याने बळी घेतला आणि 2 कोटी लोकांना त्या आजाराच्या विषाणूची बाधा झाली. चीनमधून आलेल्या या विषाणूने युनायटेड किंगडम आणि अमेरिका या दोन राष्ट्रांच्या प्रमुखांना गाठले, परंतु चीनच्या सरहद्दीलगत असलेली उज्बेकिस्तान, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान ही राष्ट्रे त्यांच्या कचाटय़ातून आश्चर्यकारकरित्या बचावली.
कोरोना या साध्या सोप्या नावाने ज्याच्या त्याच्या तोंडी झालेल्या या भयंकर आजाराचा फैलाव रोखण्यासाठी जगातील बहुतेक सर्व देशांमध्ये कडक संचारबंदी आणि व्यवहारबंदी घालण्यात आली, तिचा निर्देश करणारा ‘लॉकडाऊन’ हा परवलीचा शब्द बनला. या लॉकडाऊनने जगातील कोटय़वधी लोकांचा रोजगार हिरावून घेतला. मोटार उद्योग, पर्यटन, हॉटेल, विमान वाहतूक या व्यवसायांना त्याचा सर्वाधिक फटका बसला. कोरोनामुळे भारतासह जगातील काही मान्यवर कलावंत साहित्यिक, राजकारणी यांनी अखेरचे श्वास घेतले.
जगातील यच्चयावत बाजारपेठा बंद पाडणाऱया या चमत्कारिक आजारामुळे 2020 या संपूर्ण वर्षात मोटार गाडय़ा, यंत्रसामुग्री, शेतीविषयक आणि पुस्तकांची प्रदर्शने भरली नाहीत. ऑलिम्पिकसारख्या क्रीडा महोत्सवांना ग्रहण लागले आणि दुसऱया बाजूने मानवी संपर्क आणि संसर्ग शक्य तेवढा कमी करणाऱया उत्पादन तंत्राचाही विकास झाला. एका नवीनच प्रकारच्या उत्पादन व विक्री व्यवस्थेचा प्रारंभ करण्यास कारणीभूत ठरलेला विकार म्हणून त्याच्याकडे पाहता येईल.
2019 संपता संपता युनायटेड किंगडममध्ये ‘ब्रेक्झिट’ प्रत्यक्षात आणावयाच्या तारखा निश्चित झाल्या होत्या आणि त्या देशाच्या नवनिर्वाचित पंतप्रधानांनी 2020 मध्ये कोरोनाला तोंड देऊन ‘बेक्झिट’ला मंजुरी मिळवण्यात यश प्राप्त केले. तरीही युरोपीय महासंघातील ब्रेक्झिटशी संबंधित अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची उकल अद्याप झालेली नाही.
कोरोनाच्या महासाथीमध्ये भर म्हणून की काय अतिप्रचंड व्याप्ती असलेले वणवे मावळत्या वर्षात अनुभवायला मिळाले. ऑस्ट्रेलियातील वणव्यांनी तर 47 दशलक्ष एकर एवढा विस्तीर्ण प्रदेश व्यापला. डिसेंबर 2019 पासूनच ही वणव्यांची आग भडकली होती आणि पाठोपाठ आणखी वेगाने पसरलेल्या कोरोनाच्या साथीमुळे लोक फार लवकर वणव्याचा प्रकार विसरले.
मावळते वर्ष कोरोनाने व्यापले तरीही दहशतवाद्यांच्या कारवाया काही थांबल्या नाहीत. लेबनानची राजधानी बैरुत येथील स्फोटांनी मध्य पूर्वेला हादरवून सोडले. पावणेतीन हजार टन वजनाच्या अमोनियम नायट्रेटच्या स्फोटांमध्ये तब्बल 190 माणसांचा बळी गेला.
2020 हे वर्ष लक्षात राहील, किंबहुना ठेवले पाहिजे ते आणखी एका गोष्टीसाठी. ती म्हणजे ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ चळवळ. काळ्या-गोऱयांमधील वर्णभेद आजही नुसता शिल्लकच नव्हे तर पूर्वीपेक्षा अधिक दाहक रूपात जगात अस्तित्वात आहे याची जाणीव या चळवळीने आणि ती मागील कारणांनी करून दिली आहे. अमेरिकेतील गौरवर्णीय पोलिसांची कृष्णवर्णीय लोकांबद्दल असलेली घृणा आणि वर्चस्ववादी वृत्ती त्या पोलिसांच्या क्रूर कृत्यातून अनेकदा प्रकट होते. मावळत्या वर्षात जॉर्ज फ्लॉइड या आफ्रिकन अमेरिकन (कृष्णवर्णीय) मनुष्याला गोऱया अमेरिकन पोलिसांनी मारहाण करून जीवे मारले. जॉर्ज फ्लॉइड खेरीज अहमॉद आर्बे आणि ब्रेऑना टेलर यांचे पोलिसी अत्याचारांमुळे झालेले मृत्यूही अस्वस्थ करून गेले. या दंडेलीच्या विरोधात अमेरिकेतील लक्षावधी कृष्णवर्णीयांनी ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ हे फलक झळकवत जगभर मोर्चे काढले. पूर्वेकडे हाँगकाँगमधील चिनी हस्तक्षेपाला विरोध करणारी युवकांची निदर्शने आणि राजकारण्याचे निरंकुश वर्चस्व नाहीसे करण्याची मागणी करण्यासाठी बँकॉकमधल्या विद्यार्थ्यांनी केलेली चळवळ याही मावळत्या वर्षातील महत्त्वाच्या घटना होत्या.
2016 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीची अखेर झाल्याचा साक्षीदार म्हणून 2020 कडे पाहिले पाहिजे. या वर्षाच्या प्रारंभी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची सुनावणी झाली. त्यातून ते मुक्त झाले असले तरी अमेरिकेच्या एका लहरी विक्षिप्त आणि उथळ राष्ट्र प्रमुखाच्या ऱहासाचे पर्व म्हणून सन 2020 लक्षात राहील.
याच मावळत्या वर्षाने जो बायडेन यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवडणूक जिंकताना पाहिले. त्याहून ठळक म्हणजे यावर्षी प्रथमच एक महिला अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी आरुढ झाली. कमला हॅरिस यांचे पती त्या राष्ट्राचे पहिले ‘सेकंड जंटलमन’ ठरले ही पण एक गंमत नमूद करण्यासारखी. या संदर्भातील बाब म्हणजे जो बायडेन यांनी आपल्या मंत्रिमंडळात अनेक महिलांना पदे देण्याचा घेतलेला निर्णय. महिलांनी महत्त्वाच्या राजकीय आणि प्रशासकीय जागा मिळवण्याची इतकी ठळक अशी ही पहिलीच अमेरिकन घटना. अशा घटना भराभर घडत गेल्या. मावळते वर्ष पुन्हा नव्या कोरोनाची भीती ठेवून जात आहे. तरीही नव्या उमेदीने सामोरे जायचे आहे.
सर्व वाचकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत
या सदराचा आणि सर्वांचा निरोप घेतो.
– राजेंद्रप्रसाद मसुरकर








