संपूर्ण गाव बनले शिवमय : दोन दिवस विविध कार्यक्रम उत्साहात : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शिवमूर्तीची होणार प्रतिष्ठापना
प्रतिनिधी / बेळगाव
सावगावमध्ये श्री शिवस्मारक सेवा समिती व ग्रामस्थांच्यावतीने प्रतिष्ठापना होणारी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची पंचधातूत बनविलेली सिंहासनारूढ मूर्ती रविवार दि. 14 रोजी भव्य मिरवणुकीने गावात आणण्यात आली. स्वामी विवेकानंद कॉलनीतील गणेश मंदिराजवळ जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी पूजन केल्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. आमदार अनिल बेनके, महांतेश कवटगीमठ, माजी आमदार मनोहर किणेकर व संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी उचगाव ब्लॉक काँग्रेसचे माजी अध्यक्ष एन. के. पाटील
होते.
शिवाजी सुंठकर, डॉ. रवी पाटील, जयराम हलगेकर, रमाकांत कोंडुस्कर, भावकाण्णा लोहार, रवी कोकितकर, परशराम कोकितकर आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
रत्नकुमार मठपती व अरुण कटांबळे यांनी प्रतिमापूजन तर माधुरी अनिल हेगडे, सरस्वती पाटील, गायत्री पाटील आदींनी कलशपूजन केले. पहिल्या दिवशीची मिरवणूक नानावाडीमार्गे सावगाव गावात प्रवेश करून श्री क्षेत्र महादेव मंदिर येथे महाआरती व महाप्रसाद करून थांबविण्यात आली.
सोमवार दि. 15 रोजी श्री क्षेत्र महादेव मंदिर येथून के. वाय. घाटेगस्ती यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या उपस्थितीत दुसऱया दिवशीच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी गावामध्ये स्वागत कमानी-गुढी उभारून, सडा-रांगोळी सजावटीने तसेच माता-भगिनींनी गल्लोगल्ली मिरवणुकीचे पुष्पवृष्टी-आरती करून स्वागत केले. गावात जणू शिवसृष्टीच अवतरली होती. शेवटी श्री लक्ष्मी चौक येथे महाआरती व महाप्रसादाने मिरवणुकीची सांगता झाली.
डॉल्बीमुक्त मिरवणूक
मिरवणुकीचे वैशिष्टय़ म्हणजे डॉल्बीला फाटा देत वारकरी दिंडी, पारंपरिक वाद्ये, हजारो भगवाधारी शिवभक्तांनी मराठमोळा पेहराव अन् कलशधारी महिलांचा सहभाग हे सारं भारदस्त वातावरण स्फूर्ती प्रदान करणारे होते.
डॉल्बीमुक्तीसाठी देवस्की पंच कमिटी व ग्रामस्थ पंच कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवस्मारक सेवा समितीने मिरवणुकीसाठी एक आदर्श घालून दिला. याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
मंगळवार दि. 16 रोजी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकोट किल्ल्यांच्या मातीची पूजा करून मान्यवरांच्या हस्ते ती माती चौथऱयात अर्पण करून मूर्ती चौथऱयावर बसविण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वाय. एम. पाटील होते. ग्रामीण भाजप अध्यक्ष धनंजय जाधव यांनी उपस्थितांना अनुमोदन केले.
श्री लक्ष्मी चौक येथे होत असलेले श्री शिवस्मारक हे बहुद्देशीय असून त्यामध्ये गावासाठी पिण्याच्या पाण्याच्या टाक्मया केलेल्या आहेत. त्यांचे उद्घाटन व लोकार्पण माजी ग्राम पंचायत सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. या बहुद्देशीय स्मारकासाठी आर्किटेक्ट म्हणून एम. एस. मुतगेकर, विलोभनीय मूर्ती घडविण्याचे काम विक्रम जे. पाटील तसेच स्मारक समितीच्या कामाची सुसूत्रता संदीप खन्नुकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. याप्रसंगी निळकंठ व्यंकटेश देशपांडे (सावकार) यांनी भेट देऊन विशेष कौतुक केले. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.
नित्यपूजेसाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन
येत्या गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असून श्री शिवस्मारक सेवा समिती, ग्रामस्थ व पंच कमिटी पुढील नियोजन करीत आहे. त्याआधी गावातील सर्व हिंदू बांधवांना महाराजांच्या नित्यपूजेसाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन श्री शिवस्मारक सेवा समितीने केले
आहे.









