400 केळी, 200 सुपारी झाडे उध्वस्त
वार्ताहर / सावईवेरे
तौक्ते चक्रिवादळाचा तडाखा सावईवेरे गावातील बागायतीना मोठय़ा प्रमाणात बसला असून या भागातील बागायतदारांचे भयंकर नुकसान झाले आहे. यात केळी व सुपारी बागायतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाली आहे.
रविवारी झालेल्या चक्रीवादळाने केळीच्या बागा मोठय़ा प्रमाणात उध्वस्त झाल्या. तसेच बऱयाच ठिकाणी अनेक पोफळीची झाडे मोडून पडली. बोणये भागात सुमारे 400 केळी उध्वस्त झाली. शिलवाडा, पाली व वेलकास भागात तर अंदाजे 200 सुपारीची झाडे मोडून पडलेली आहे.
सावईवेरे हा कुळागरी गाव असून या गावातील वेलकास, सावई, शीलवाडा, पाली, बोणये आदी भागात सुपारी व केळीची मोठया प्रमाणात पीक घेतले जाते. या भागातील बागायतदार आपल्या कुळागारात कबाडकष्ट करून चांगले पीक घेतात मात्र नैसर्गिक आपत्तीसारख्या वादळांचा जबर फटका बसल्याने पीक नष्ट होऊन त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
कृषि खात्याने नुकासानीचा आकडा जारी केला असला तरी सरकारी नुकसानीच्या भरपाईच्या आकडय़ात सदर बागायतदारांचा समावेश आहे की नाही याचीही माहिती त्यांनी अजून नाही. नुकसान भरपाई मिळण्यासाठी कृषी कार्ड सक्तीचे असल्याने सावईवेरे भागात असे काही बागायतदार आहेत ज्याच्याकडे कृषी कार्ड नाही. काही बागायतदारांनी दिलेल्या माहितीनुसार कृषी कार्डसाठी कृषी खात्याचे बरेच निकष असल्याने हे निकष काहींना पाळणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना सरकारची नुकसान भरपाई मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. तरी कृषी खात्याच्या अधिकाऱयांनी प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्तांना सरकार दरबारी आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी बागायतदारांची मागणी आहे.









