काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
प्रतिनिधी /पणजी
गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने काल मंगळवारी राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांची भेट घेऊन राज्यासंदर्भातील विविध मुद्यांचा उहापोह करणारी दोन निवेदने त्यांना सादर केली, तसेच मोदी सरकारच्या आशीर्वादाने झालेल्या ’पिगॅसस हेरगिरी’ची चौकशी करण्याची मागणी राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींकडे केली. राज्यातील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार राज्याचे हित जपण्यास आणि गोमंतकियांचे रक्षण करण्यास अपुरे पडल्याचा ठपका ठेवत सदर सरकार त्वरित बरखास्त करावे, अशी आग्रही मागणी यावेळी राज्यपालांकडे काँग्रेस शिष्टमंडळाने केली.
राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, काँग्रेस सरचिटणीस आणि माजी आमदार आग्नेलो फर्नाडिस, महिला काँग्रेस अध्यक्षा बिना नाईक, युवा काँग्रेस अध्यक्ष ऍड. वरद म्हार्दोळकर, सेवा दल प्रमुख शंकर किर्लपारकर, एनएसयुआय अध्यक्ष नौशाद चौधरी यांचा समावेश होता. गोव्याचे राज्यपाल म्हणून राज्याच्या घटना प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल पक्षाच्यावतीने आणि जनतेच्या वतीने श्रीधरन पिल्लई यांना काँग्रेसकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
राज्यापालांनी पुरग्रस्त भागात पाहणी करावी
गोव्यातील पूरग्रस्त भागाचा राज्यपालांनी ताबडतोब दौरा करावा जेणेकरुन सरकारी यंत्रणा जागी होणार व लोकांना काहीतरी मदत होणार असे राज्यपालांना सांगितल्याचे गिरीश चोडणकर म्हणाले. गोव्याची अस्मिता सांभाळण्यासाठी तसेच गोमंतकीयांचे कष्ट कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आम्ही राज्यपालांकडे केल्याचे दिगंबर कामत यांनी सांगितले.
राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली
राज्यपालांना दिलेल्या निवेदनात कोविड महामारीच्या जोडीला राज्यशासनाच्या गैरनियोजनामुळे राज्याची एकूण झालेली आर्थिक विपन्नावस्था, राज्यात कायदा सुव्यवस्थेला फासलेला हरताळ अशा कठीण काळात राज्याचे प्रमुख म्हणून सूत्रे सांभाळताना आपल्यासमोर अनेक अडथळे आहेत. राज्यामध्ये सध्यस्थितीत पर्यावरण, जंगले, वन्यजीव आणि एकूण गोव्याच्या हितालाच धोका निर्माण झाला आहे. राज्यसरकारच्या अयशस्वी आणि असंवेदनशील राज्यकारभारामुळे जनतेच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले असून, त्यांना जगण्याबद्दल आणि जगण्याच्या प्राधान्यक्रमाबद्दलच साशंकता निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.









