तहसीलदारांनी दिले होते दहा सिलिंडर
प्रतिनिधी / सावंतवाडी:
सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी दहा ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिले. मात्र, भीतीपोटी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने ते स्वीकारलेले नाहीत. त्यामुळे सिलिंडर पडून आहेत. सिलिंडर क्वारी मालकांकडून घेण्यात आले होते. ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून ते उपलब्ध करण्यात आले होते. रुग्णालयाला आवश्यक असे नॉबही सिलिंडरला बसविण्यात आले. तरीही ते स्वीकारण्यात आले नाहीत. उपलब्ध माहितीनुसार तंत्रज्ञ नसल्याने रुग्णालय प्रशासन सिलिंडर घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे समजते. रुग्णालयात पी. एम. केअर फंडातील पाच व्हेंटिलेटरही पडून आहेत. त्यापैकी तीन नादुरुस्त आहेत. तंत्रज्ञ नसल्याने ते दुरुस्त झालेले नाहीत. ऑक्सिजन सिलिंडर नसल्याची ओरड आहे. मात्र, उपलब्ध असलेले सिलिंडर पडून आहेत. रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडरसाठी वणवण करावी लागत असल्याचा आरोप नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी केला असतानाच आता पडून असलेल्या ऑक्सिजन सिलिंडरचे प्रकरण पुढे आले आहे. यासंदर्भात रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांना विचारले असता सदर सिलिंडर धोकादायक आहेत. रुग्णांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे ते स्वीकारलेले नाहीत, असे स्पष्ट केले.









