वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी शहरातील मुख्य बाजारपेठेत आता वाहन पार्किंगसाठी पैसे मोजावे लागणार आहेत पैसे. संत गाडगेबाबा भाजी मंडईबाहेरील विक्रेत्यांना हटविल्यानंतर आता नगराध्यक्ष संजू परब यांनी पालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पे ऍन्ड पार्क’ची सुविधा करण्याचे निश्चित केले आहे.
दोन महिन्यापूर्वी नगराध्यक्ष परब यांनी माजी मार्केट एका छताखाली आणले. पूर्वी रस्त्यालगत मोकळय़ा जागेत भाजी विक्रेते बसायचे. ही जागा आता मोकळी आहे. भाजी मंडईत येणाऱया नागरिकांना पार्किंग सुविधा देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या मोकळय़ा जागेत ‘पे ऍन्ड पार्क’ सुविधा सुरू करण्याबाबत निविदा काढली आहे. येत्या 23 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन निविदा भरायची आहे. 9 नोव्हेंबरला निविदा उघडण्यात येणार आहे. त्यानंतर पे ऍन्ड पार्किंगचे दर निश्चित करून अंमलबजावणी केली जाणार आहे. पे ऍन्ड पार्कमुळे वाहनधारकांना पैसे मोजावे लागणार आहेत.









