वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी तालुक्यात 63 गावांपैकी 36 ठिकाणी आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित आहेत. तर पाच ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या केंद्रांमध्ये सध्या 20 डॉक्टर कार्यरत आहेत. आणखी 16 डॉक्टरांची कमतरता भासत आहे. सांगेली, मळेवाड, आंबोली, बांदा, निरवडे या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी दोन डॉक्टर नियुक्त करण्यात आले आहेत. सांगेली आरोग्य केंद्रातील एका डॉक्टरने नोकरी सोडल्याने हे पद रिक्त आहे. त्यामुळे एकाच डॉक्टरवर आरोग्य केंद्राचा कारभार आहे.
सावंतवाडी शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. साडेचारशे रुग्णसंख्या होत आली आहे. तर 22 जणांचा मृत्यू झाला आहे. बांदा, आरोंदा, निरवडे येथे कोरोना रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. भात कापणी आणि त्यात पावसामुळे सर्दी, तापाचे रुग्ण वाढत आहेत. गावात डॉक्टर मिळत नाहीत. काही उपकेंद्रात डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. खासगी दवाखाने बंद असल्याने जनतेचे हाल होत आहेत. गावातील आरोग्य केंद्रे 24 तास कार्यरत ठेवावीत, अशी मागणी होत आहे.
सावंतवाडी तालुक्यातील पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रात नऊ डॉक्टर तसेच अन्य कर्मचारी आहेत. एका डॉक्टरची कमतरता आहे. सांगेली आरोग्य केंद्रात वेर्ले, सांगेली, शिरशिंगे, कलंबिस्त, माडखोल, कारिवडे या गावांचा समावेश होतो. कारिवडे, कोलगाव, कलंबिस्त येथे उपकेंद्र आहेत. यापैकी कोलगाव उपकेंद्रात डॉक्टर देण्यात आला आहे. कलंबिस्त व कारिवडे उपकेंद्रात डॉक्टरची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे. 36 ठिकाणी उपकेंद आहेत. त्यापैकी 20 उपकेंद्रात प्रत्येकी एक डॉक्टर नियुक्त आहे. 16 उपकेंद्रात डॉक्टरच नाहीत. नर्स कारभार पाहत आहेत. गावागावातील उपकेंद्रात डॉक्टर, नर्सच्या नियुक्त्या करण्याची मागणी वाढत आहे. जेणेकरून लोकांना दिलासा मिळेल. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांनी सांगितले की, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर पुरेसे आहेत. परंतु उपकेंद्रात डॉक्टर कमी आहेत. नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे. आरोग्य केंद्राच्या माध्यमातून गावागावात जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे.









