सावंतवाडी:
येथील मोती तलावाच्या काठावर झोपलेल्या परप्रांतीय मजुराचा मोती तलावात पडून मृत्यू झाला. हा प्रकार मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. सदरचा मजूर हा सावंतवाडीत काम सुरू असलेल्या एका इमारतीच्या ठिकाणी अन्य कामगारांसोबत गेल्या काही दिवसांपासून कार्यरत होता, असे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे. तो दादा या नावाने परिचीत होता. तो पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे. त्याचे पूर्ण नाव व पत्ता अद्याप स्पष्ट झाला नाही. त्याच्या नातेवाईकांशी पोलीस संपर्क साधण्याचे प्रयत्न करीत होते. निजाम मक्तार हुसेन अलाम (सध्या रा. सावंतवाडी) यांनी या घटनेबाबतची माहिती पोलिसांना दिली.









