छळाच्या तक्रारीवरून सहाय्यक पोस्टमास्तर पतीसह सासऱयाला अटक
सावंतवाडी:
शहरातील सबनीसवाडा येथे राहणाऱया निधी नीलेश पास्ते (27) या नवविवाहितेने गळफास घेत मंगळवारी रात्री आत्महत्या केली. पती आणि सासरच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कारिवडे-सावंतवाडी येथील माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. तिचा पती नीलेश देवसू येथे सहाय्यक पोस्टमास्तर म्हणून कार्यरत आहे. पोलिसांनी निधीचे वडील प्रभाकर माळकर यांचा जबाब घेऊन निधीचा पती, सासू, सासऱयांवर गुन्हा दाखल केला. तर पती आणि सासऱयाला अटक करण्यात आली.
नीलेश हा निधीचा वारंवार छळ करत होता. त्याने तिला दोनवेळा कोंडूनही ठेवले होते. त्यासंदर्भात पती नीलेश याला समजावण्यात आले होते. परंतु छळ सुरुच होता. शेवटी जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली, असा आरोप निधीच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला. निधीच्या आत्महत्येची घटना कळताच कारिवडे ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात धाव घेत पतीच्या अटकेची मागणी केली.
कारिवडे-माळकरवाडी येथील शिवप्रिया प्रभाकर माळकर हिचा विवाह 2018 मध्ये कलंबिस्त-पास्तेवाडी येथील नीलेश पास्ते याच्याशी झाला. तो देवसूत सहाय्यक पोस्टमास्तर म्हणून कार्यरत आहे. त्याच्या वडिलांनी सावंतवाडी-सबनीसवाडा येथे फ्लॅट घेतला आहे. तेथे नीलेश आणि निधी राहायला आले. लग्नाला काही कालावधी गेल्यानंतर निधीचा नीलेशकडून छळ करण्यात येऊ लागला. तिला कोंडूनही ठेवले होते. याबाबत नीलेशला समजही देण्यात आली. मात्र, तिचा छळ सुरुच होता. आठवडाभरापूर्वी निधी माहेरी कारिवडे येथे गेली होती. ती मंगळवारी सावंतवाडीत आली. सायंकाळी पती आठवडा बाजारात खरेदीसाठी गेला होता. त्यानंतर तो घरी आला, त्यावेळी फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता. त्याने दरवाजा ठोठावला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे निधीच्या मोबाईलवर संपर्क साधला. तरीही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱयांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आली. तेव्हा निधी गळफास लावलेल्या स्थितीत आढळली.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक शंकर कोरे, पोलीस अधिकारी एस. एम. वालावलकर, जयराम पाटील, पोलीस कर्मचारी प्रसाद कदम, महेश जाधव, जगदीश दुधवडकर, मुकुंद सावंत, रामचंद्र साटेलकर, महिला कॉन्स्टेबल सुनिता नाईक यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह चिकित्सेसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणला. बुधवारी विच्छेदन करून मृतदेह सासरच्या मंडळींकडे देण्यात आला. कलंबिस्त येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काही वर्षांपूर्वी निधीच्या आईचा कारिवडे येथे नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. तिला दोन भाऊ आहेत.
कारिवडे ग्रामस्थांची धाव
दरम्यान, निधीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच तिच्या कारिवडेतील नातेवाईक आणि ग्रामस्थांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पती आणि तिच्या सासरच्यांच्या जाचाला कंटाळून निधीने आत्महत्या केली, असा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली. यावेळी कारिवडे सरपंच अपर्णा तळवणेकर, पोलीस पाटील प्रदीप केळुसकर, संदीप ऊर्फ बाळू माळकर, जि. प. माजी सभापती मंगेश तळवणेकर, माजी सरपंच लक्ष्मण गावकर, नरेश परब, बाळा बोभाटे, राजन माळकर, चेतन माळकर, रोशन माळकर, हरी माळकर, संतोष बिले, दिनेश पालव, बाबू पालव, सुनील परब, बाळा राणे, आनंद तळवणेकर, सखाराम परब उपस्थित होते.
ग्रामस्थांनी रुग्णालयातही धाव घेतली.
तिघांवर गुन्हा, अटकेची कारवाई
निधीच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, निधी हिला पती नीलेश, सासू निर्मला पास्ते, सासरे ज्ञानेश्वर पास्ते हे विवाह झाल्यापासून क्रूर वागणूक देऊन मानसिक व शारीरिक त्रास देत होते. पती तिला वारंवार मारहाण करत होता. त्यानुसार निधीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर भादंवि कलम 306, 498 (अ), 323, 504, 506 (34) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पती नीलेश आणि सासरे ज्ञानेश्वर पास्ते यांना बुधवारी सायंकाळी अटक करण्यात आली, अशी माहिती पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली. दोघांनाही गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील करत आहेत.









