तीन ठिकाणी केले वार, जखमी चालक हातकणंगलेचा : चालक फरशी घेऊन आला होता सावंतवाडीत
पहाटे साडेतीनच्या सुमारास जिमखाना रोडवर हल्ला दुचाकीवरून आले होते हल्लेखोर : हल्ला लुटीच्या उद्देशाने की अन्य कारणे?
प्रतिनिधी / सावंतवाडी:
हातकणंगले-कोल्हापूर येथील टेम्पोचालक अजयकुमार श्रीपतराव पाटील (46, रा. हंडोली, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) यांना दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी अडवून त्यांच्यावर प्राणघातक चाकूहल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बांबोळी-गोवा येथे उपचार सुरू आहेत. शहरातील आंबोली-बेळगाव मार्गावरील गवळी तिठय़ानजीक जिमखाना मैदान रस्त्यावर शनिवारी पहाटे ही घटना घडली. रक्तबंबाळ अवस्थेत ते तीन तास टेम्पोत पडून होते. परिसरातील युवकांच्या सतर्कतेमुळे त्यांना रुग्णालयात हलविल्याने त्यांचे प्राण वाचले. हा हल्ला लुटीच्या उद्देशाने झाला की त्यामागे अन्य कारण आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत.
दोघा तरुणांनी काळय़ा रंगाच्या ऍक्टिव्हा दुचाकीने येत चालक पाटील यांना अडवून त्यांच्याकडून मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्याशी हुज्जत घालून चाकूहल्ला करून पसार झाले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके व पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी भेट दिली. चालक पाटील हे टेम्पोत बेशुद्धावस्थेत पडून होते. घटनास्थळाचा पंचनामा करून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पार्किंगसाठी जात असताना हल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक पाटील हे कोल्हापूर येथील फरशी गोदामातील फरशी टेम्पोत भरून ते कणकवलीमार्गे सावंतवाडीत येत होते. पहाटे पाचच्या सुमारास गवळी तिठा येथे टेम्पो आला असता सकाळ होईपर्यंत टेम्पो पार्क करून विश्रांती करावी, या हेतूने ते जिमखाना मैदानालगत डॉ. स्वार हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर टेम्पो पार्क करण्यासाठी आले. त्यावेळी मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्याशी हुज्जत घालत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच अवस्थेत त्यांनी टेम्पो रस्त्यावरच मध्यभागी ठेवला. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खेळण्यासाठी आलेल्या तरुणांच्या सतर्कतेमुळे सदर प्रकार उजेडात आला. हल्लेखोरांनी पैसे व मोबाईलची मागणी केल्याचे त्यांनी जबाबात म्हटले. त्यानुसार पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला होता.
दुचाकीचा नंबर सापडला
हल्लेखोर दुचाकीस्वारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शहरातील सर्व मार्गांबरोबरच आंबोली येथे नाकाबंदी केली. शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱयांचे फुटेज घेण्यात आले असून हल्लेखोर कॅमेऱयात केद झाले आहेत. त्या दुचाकीच्या नंबरवरून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. त्यांना जेरबंद केल्यानंतर हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
टेम्पो अडवून केला हल्ला
टेम्पोचालक पाटील हे कोल्हापूर येथून फरशा टेम्पोत भरून सावंतवाडीत एका दुकानात उतरण्यासाठी येत होते. शनिवारी पहाटे 3.30 च्या सुमारास ते सावंतवाडी गवळीतिठा येथे आले. तेथून जिमखाना मैदानाजवळ पार्किंगसाठी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांना टेम्पो थांबवून चालकाला टेम्पोतच धक्काबुकी केली. तसेच चाकूने त्यांच्या पोटावर, मानेच्या खाली, छातीवर
प्राणघातक हल्ला करून रक्तबंबाळ करत पसार झाले. चालक पाटील जखमी जखमी व बेशुद्धावस्थेत तसेच पडून होते. पहाटे 6.30 च्या सुमारास जिमखाना मैदान येथे क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या खेळाडूंच्या जागृकतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळविले.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके, पोलीस निरीक्षक शशिकांत खोत, सहाय्यक निरीक्षक स्वाती यादव, सहाय्यक निरीक्षक तौसिफ सय्यद, हवालदार मनोज राऊत, धनंजय नाईक आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी पाटील यांना पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून तात्काळ उपचार सुरू करण्यात करण्यात आले. ते शुद्धीवर येताच पोलिसांनी त्यांचा जबाब घेतला. त्यानंतर अधिक उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेने बांबोळी-गोवा येथे हलविण्यात आले. तसेच जखमी चालकाचे नातेवाईक व टेम्पो मालकाला या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांचे नातेवाईक सावंतवाडीकडे येण्यास निघाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पाटील हे कोल्हापूर येथून फरशा आणून त्या माजगाव येथील महालक्ष्मी ट्रेडर्स दुकानात उतरविणार होते. तशी माहिती दुकानदाराला देण्यात आली होती. त्यामुळे दुकानदार त्या टेम्पोची वाट पाहत होता. सकाळी चालकावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती दुकानदाराला समजताच त्याने रुग्णालयात धाव घेतली.
पैसे, मोबाईलसाठी हल्ला?
अजयकुमार पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केबिनमध्ये चढून पैसे व मोबाईल हिसकावत हल्ला केला. दोघांनी हल्ला केल्यावर आपण आरडाओरड केली. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. आपण जखमी अवस्थेतच टेम्पो पुढे नेऊन लावला. त्यानंतर बेशुद्ध झाल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासणीत चालकाजवळ असलेली रक्कम व मोबाईल सुरक्षित असल्याचे आढळले. आपला एक मोबाईल चारटय़ांनी नेल्याचे पाटील यांनी सांगितले. या खुनी हल्ल्यामागचे नेमके काय कारण आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत.
सीसीटीव्ही कॅमेऱयात हल्लेखोर कैद
दुचाकीने आलेल्या हल्लेखोरांचा शोध लावण्यासाठी पोलीस यंत्रणेने सर्वत्र तात्काळ नाकाबंदी केली. गवळी तिठा व अन्य ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयातून तसेच घटनेच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयाद्वारे घटनेच्या ठिकाणचे फुटेज मिळविले आहे. त्यांच्या दुचाकीच्या नंबरवरून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ते सापडल्यानंतरच हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.









