रुग्णालयीन दोन कर्मचारी, व्यापाऱयाच्या पत्नीचा समावेश
लाखे वस्तीतही कोरोनाचा शिरकाव
28 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह
शहरात सक्रिय रुग्ण 43
प्रतिनिधी / सावंतवाडी:
सावंतवाडी शहरात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. शहरात ग्रामीण भागाच्या तुलनेत कोरोनाचा आलेख वाढत आहे. जिमखाना मैदानाजवळील लाखे वस्तीतही कोरोनाने शिरकाव केला आहे. तेथील 28 वर्षीय महिला रॅपिड टेस्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. गुरुवारी सायंकाळी उशिरा शहरात आणखी पाच रुग्ण आढळले आहेत. त्यात उपजिल्हा रुग्णालयातील दोन कर्मचाऱयांचा समावेश आहे. इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील एका व्यापाऱयाची पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. भटवाडी येथेही एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला. तर एका रुग्णाचा ट्रेस लागलेला नाही.
वाढती रुग्णसंख्या शहराच्या दृष्टीने ही च्ंिातेची बाब आहे. शहरातील व्यापाऱयाचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर पालिका आरोग्य कर्मचाऱयाची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. शहरात सोमवारपासूनचे 18 अहवाल प्रलंबित आहेत. शहरातील परिस्थिती पाहता आता शहरवासीयांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पालिकेचा आरोग्य विभाग कोरोना रुग्णांचा ट्रेस लावण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु नवनवी आव्हाने आरोग्य विभागासमोर आहेत.
सावंतवाडी तालुक्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 164 झाली आहे. त्यात शहरातील रुग्णांची संख्या 68 आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. रुग्णांची ही संख्या अलिकडच्या काळातील आहे. सध्या शहरातील ऍक्टिव्ह रुग्ण 38 आहेत. शहरात आतापर्यंत दोघाजणांचा मृत्यू झाला आहे. तर 35 कंटेनमेंट झोन आहेत. केवळ 23 रुग्ण बरे होऊन गेले आहेत. दीडशे वस्ती असलेल्या लाखे वस्तीत कोरोनाने शिरकाव केला आहे. तेथील महिला कोरोना पॉझिटिव्ह सापडली आहे. त्यामुळे शहरवासीयांची चिंता वाढली आहे. यंदा गणेश चतुर्थी उत्सव साधेपणाने आणि नियम पाळून साजरा झाल्याने तसेच मुंबईकर चाकरमानी ऐन गणेश चतुर्थीत न आल्याने ही संख्या मर्यादित आहे. मात्र, शहरात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या ग्रामीण भागासाठीही धोकादायक ठरणारी आहे. शहरात खरेदीसाठी आणि अन्य कामासाठी लोक येत असल्याने त्यांना संसर्ग होण्याची भीती आहे.
संपूर्ण वस्तीत कंटेनमेंट झोन नको!
दरम्यान, रुग्ण आढळल्याने लाखे वस्तीत कंटेनमेंट झोन करण्यात आला आहे. मात्र, या वस्तीत राहणारे लोक हे मोलमजुरी करून त्यावर उदरनिर्वाह करणारे आहेत. संपूर्ण वस्तीच सील केली तर त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहू शकतो. त्यामुळे त्या महिलेच्या घरापुरता कंटेनमेंट झोन करावा, अशी तेथील नागलिकांची मागणी आहे.









