प्रतिनिधी / सातारा :
ओझर्डे ता. वाई येथे शेतवस्तीत पत्र्याच्या शेडमध्ये साळींदर या वन्यप्राण्याचे मांस शिजवून पार्टी करणाऱ्या 6 जणांवर वनविभागाने कारवाई केली आहे. भरत सुरेश जाधव (वय 32), महेश अशोक साळुंखे (वय 26), गणेश अर्जुन कारंडे (वय 30), सोमनाथ काळू पवार (वय 47), नितीन अरूण गायकवाड (वय 26), मनोज नारायण घोरपडे (वय 39) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
वनविभागाने दिलेली माहिती अशी, ओझर्डे ता. वाई येथे 7 रोजी सोनेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शेतवस्तीमधील पत्राच्या शेडमध्ये भरत जाधव, महेश साळुंखे, गणेश कारंडे, सोमनाथ पवार, नितीन गायकवाड, मनोज घोरपडे हे साळींदर या वन्यप्राण्याचे मांस पातेल्यामध्ये शिजवून पार्टी करताना आढळून आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे धाड टाकून या पाच जणांना ताब्यात घेवून मुद्देमाल जप्त केला आहे. यातील संशयित मनोज घोरपडे हा अंधाराचा फायदा घेवून फरार झाला आहे. या संशयितांकडे चौकशी केली असता त्यांना साळींदराचे मांस दिपक ज्ञानेश्वर चव्हाण रा. कणूर ता. वाई यांनी आणून दिल्याची जबाबात कबूल केले आहे. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी वाई स्नेहल मगर, वनपाल भुईंज संग्राम मोरे, वनपाल सुरेश पटकारे, वनरक्षक वैभव शिंदे, संदिप पवार, वडवली रामेश्वर भोपळे यांनी केली.









