जनतेमध्ये कमालीची नाराजी, जलस्रोत खात्याने लागू केलेली प्रवेशबंदी महामारीचा विचार करून कायम ठेवण्याची मागणी
प्रतिनिधी / सांगे
एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून महामारी आटोक्मयात येण्याची चिन्हे काही दिसून येत नाहीत. त्यातच प्रशासनाकडून लोकांना या रोगाचा संसर्ग वाढू नये म्हणून खबरदारी घेण्याचे आवाहन केले जाते आहे. मात्र दुसरीकडे साळावली धरण पर्यटकांना खुले करण्यासाठी सरकार पातळीवर जोरदार हालचाली चालू असल्याची माहिती विशेष गोटातून मिळाली आहे. त्यामुळे सांगेतील जनतेमध्ये कमालीची नाराजी पसरली असून सरकारने जनतेच्या जिवाशी न खेळता कोणत्याही परिस्थितीत धरण पर्यटकांसाठी खुले करू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
साळावली धरणाचा जलाशय गेल्या गुरुवारी तुडुंब भरून वाहू लागला आहे. वास्तविक कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने मार्च महिन्यापासून धरणासह येथील बॉटनिकल गार्डनमध्ये पर्यटकांना जायला मिळालेले नाही. जलाशय भरून वाहू लागल्यानंतर जलस्रोत खात्याने कोविड-19 चे संकट असल्याने पर्यटकांना प्रवेशबंदी जाहीर केली व तशी नोटीस जारी केली. एरव्ही जलाशय भरून वाहू लागला की, धरण परिसरात पर्यटकांची गर्दी व्हायची. सुट्टीच्या दिवशी तसेच शनिवारी व रविवारी किमान 3 ते 4 हजारच्या आसपास गोवाभरातील लोक तसेच अन्य ठिकाणचे देशी पर्यटक येथे जमायचे. हे सगळे चित्र पाहता जलस्रोत खात्याने पर्यटकांना जी प्रवेशबंदी केलेली आहे ती योग्य असल्याचे मत सांगेतील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
जलस्रोत खाते पर्यटकांवर बंदीच्या बाजूने
मुळात धरणावर प्रवेश करायचा असल्यास जलस्रोत खात्याच्या फाटकातून करावा लागतो. त्यानंतर वन विकास महामंडळाचा बॉटनिकल गार्डनमध्ये प्रवेश करण्यासाठी तिकीट कक्ष लागतो. तेथे प्रवेश शुल्क भरून तिकीट घ्यावी लागते. त्यानंतर आतमध्ये सोडले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, जलस्रोत खात्याने कोविडची महामारी लक्षात घेता तसेच मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होणे कठीण असल्याने पर्यटकांना प्रवेशबंदी असावी अशी भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे वरि÷ प्रशासकीय पातळीवरून पर्यटकांना प्रवेश देण्यासाठी हालचाली चालू झाल्या आहेत. त्यामुळे केव्हाही प्रवेशाची द्वारे खुली होऊ शकतात. ही वार्ता सांगेमधे पसरल्यावर लोकांमध्ये भीती पसरली आहे.
सुरक्षा रक्षक, कर्मचाऱयांमध्ये भीतीचे वातावरण
सध्या धरणावर सुरक्षेसाठी गोवा मानव संसाधन महामंडळाचे सुरक्षा रक्षक सेवा बजावत आहेत. ते सांगेसह वेगवेगळय़ा भागांतील असून त्यांच्यामध्येही कमालीची भीती निर्माण झाली आहे. तसेच बॉटनिकल गार्डनमध्ये सुमारे 90 च्या आसपास सांगेतील लोक काम करत आहेत. समजा एखादा कोरोनाबाधित येथे आला, तर संसर्ग या कामगारांमार्फत सांगेतील विविध भागांमध्ये फैलावू शकतो ही भीती सर्वांना भेडसावत आहे. सरकारच्या वरि÷ अधिकाऱयांना धरण पर्यटकांना खुले करण्याची इतकी घाई का, असा प्रश्न उगेचे माजी सरपंच अनिल जांगळी यांनी केला आहे.
सांगेचे मांगोरहिल बनवायचे नाही : नगराध्यक्ष
या पार्श्वभूमीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगेचे नगराध्यक्ष कॅरोज क्रूझ यांनी कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून अगदी सुरुवातीपासून सांगेचे प्रशासन, नगरपालिका, आरोग्य केंद्र व जनतेने उत्तम प्रकारे कार्य केले आहे, याकडे लक्ष वेधले. आता धरणावर पर्यटकांना प्रवेश देऊन सरकार काय साधू पाहत आहे, असा सवाल त्यांनी केला. सध्या कोविड-19 ची महामारी आटोक्मयात आणण्यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. मौजमजा करण्याचे हे दिवस नाहीत. जलस्रोत खात्याने जी पर्यटकांना प्रवेशबंदी केली आहे तीच योग्य आहे, असे ते म्हणाले. सांगेचे आम्हाला मांगोरहिल, वास्को करायचे नाही. सरकारने जनतेचे हित लक्षात घेऊन यंदा धरण खुले करूच नये. धरणावर शनिवारी, रविवारी होणारी गर्दी लक्षात घेता तेथे सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडेल. तसेच स्थानिक प्रशासनावर ताण येणार असून मार्गदर्शन तत्त्वांचे पालन होणार नाही. हे ध्यानात घेऊन सरकारने यावषी धरणावर प्रवेशबंदी कायम ठेवावी, अशी मागणी क्रूझ यांनी केली आहे.









