मंगळवारी भल्या सकाळी जलाशय भरून वाहण्यास प्रारंभ, गतवर्षाच्या तुलनेत चार दिवस उशिरा नोंद, कोरोनामुळे यंदाही पर्यटकांना हुकली संधी
प्रसाद तिळवे /सांगे
निसर्गसौंदर्याचा सुंदर आविष्कार घडविणाऱया, गोव्याचे भूषण आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या सांगेतील साळावली धरणाचा जलाशय पूर्ण भरून वाहू लागला आहे. गेल्या वषी धरणाचा जलाशय 9 जुलै रोजी भरला होता. यंदा तो चार दिवस उशिरा भरला आहे. एरव्ही जलाशय भरून पाणी वाहू लागल्यावर हे मनोहरी दृष्य पाहण्यासाठी साळावली धरणाकडे पर्यटकांची रांग लागायची. मात्र कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षापासून पर्यटकांना धरणावर जाण्यास बंदी आहे. त्यामुळे यावषी देखील कोरोनामुळे पर्यटकांना हा आनंद लुटता येणार नाही.
जलाशय भरून पाणी बाहेर पडण्याचा क्षण मंगळवारी सकाळी 6.04 वा. आला. सोमवारी धरणाचा जलाशय काठोकाठ भरला होता. यंदा मे महिन्यात वादळासह पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे पावसाचा अंदाज पाहता जलशय लवकर भरणार असे चित्र होते. पण गेल्या वर्षाच्या तुलनेत चार दिवस उशिरा भरला. मंगळवारी पाण्याची पातळी 41.15 मीटर इतकी राहिली. 2019 मध्ये 17 जुलैला जलाशय भरून ओव्हरफ्लो झाला होता. 2018 मध्ये 11 जुलै रोजी तो भरून वाहू लागला होता. गेल्या वषी जलाशय भरल्याच्या दिवशी 1626 एम. एम., तर यंदा 1284 एम. एम. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या जलाशयातील पाण्याची पातळी वाढली आणि ती 41.15 मीटर उंचीवर पोहोचली की, आपोआप पाणी ओव्हरफ्लो होऊ लागते.
साळावली धरण हे गोव्यातील सर्वांत मोठे असे धरण आहे. शेती आणि पिण्याचे पाणी तसेच औद्योगिक गरजा भागविण्यासाठी दक्षिण गोव्याला ते जसे वरदान आहे तसेच पर्यटनाच्या बाबतीत गोव्याची शान वाढवत आहे. धरणाच्या पायथ्याशी असलेले ‘बॉटनिकल गार्डन आणि मनोरंजन पार्क’ येथील सैंदर्यात भर घालतो. पण गेल्या वर्षापासून कोरोना महामारीमुळे हे सर्व बंद आहे. त्यामुळे प्रवेश फीपोटी पर्यटकांकडून गोवा वन विकास महामंडळाला मिळणारा महसूल बंद आहे.
विलोभनीय दृष्य
गेल्या वषी 9 जुलै रोजी रात्री 8.25 वा. जलाशय भरून वाहू लागल्याचा क्षण घडून आला होता. जलाशयाचे पाणी 41.15 मीटर पातळीवर पोहोचले की, ते वरून खाली विहिरीत कोसळू लागते आणि खाली नदीत वाहून जाते. पाणी कोसळू लागल्यावर जे तुषार उडतात ते दृश्य विलोभनीय असते. हे तुषार अंगावर शहारे आणतात.
गोव्यातील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून गेल्या अठरा वर्षांत साळावली धरण नावारूपास आलेले आहे. साळावली धरणाच्या जोडीला ‘बॉटनिकल गार्डन’ ही जमेची बाजू ठरली आहे. येथील वातावरण माणसाला प्रसन्न करणारे आहे. दोन वर्षांपूर्वी मोठय़ा प्रमाणात देशी-विदेशी पर्यटकांनी धरण आणि बॉटनिकल गार्डनला भेट देऊन निसर्गसौंदर्याचा आनंद लुटला होता. कोरोनाची महामारी कायम असल्याने यंदाही धरणावर पर्यटकांना जाता येणार नाही.
जुलै महिन्यात तुडुंब भरतो जलाशय
जुलै महिना आला की, धरणाचा जलाशय तुडुंब भरून वाहू लागतो. या जलाशयात 226.800 दशनलक्ष घन मीटर पाणी साठविण्याची क्षमता असून धरणाच्या मुखातून बाहेर पडणाऱया पाण्याची क्षमता 60 घन मीटर प्रति सेकंद इतकी आहे. या धरणाची लांबी 1004 मीटर इतकी आहे. ‘यू’ आकाराची रचना असलेले हे धरण माती वापरून बांधण्यात आले असून त्याचा जलाशय 24 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेला आहे. जलाशय भरल्यानंतर वाडे कुर्डी, विचुंदे, कुर्पे, दापोडा या भागांत पाण्याची पातळी वाढते.
सध्या जलाशय तुडुंब भरलेला पाहायला मिळत आहे. एरव्ही या धरणावर पावसाळय़ात नेहमी पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळत असे. मात्र गेल्या वषी 22 मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून धरण ओस पडलेले आहे. मधल्या काळात काही महिने धरणावर सोडण्यात येत होते. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा प्रवेशबंदी जाहीर करण्यात आली. सांगे, नेत्रावळी भागांत दरवषी सर्वाधिक पाऊस पडतो.









